बीड

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांवर भाजपची वाटचाल सुरु

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांवर भाजपची वाटचाल सुरु
संस्कार भारतीचे कुलदीप धुमाळे यांचे प्रतिपादन; बीडमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियानाचे उदघाटन
बीड (प्रतिनिधी)
दि.३ : पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांवर आधारित भाजपची वाटचाल सुरु आहे. कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रभक्ती व विचारशक्ती रुजविण्यासाठी प्रशिक्षण महाभियान उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन संस्कार भारतीचे कुलदीप धुमाळे यांनी केले.
शहरातील सौ. के. एस. के. महाविद्यालयाच्या सभागृहात भाजप बीड शहर मंडळाच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियानाचे उदघाटन शुक्रवारी (दि.३) उत्साहात पार पडले. यावेळी मार्गदर्शक म्हणून कुलदीप धुमाळे हे बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, ज्येष्ठ नेते विजयकुमार पालसिंगणकर, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे, प्रा.देविदास नागरगोजे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम व महाराष्ट्र गीताने झाली.
पुढे बोलताना कुलदीप धुमाळे म्हणाले, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याचा आढावा घेतला. पंडित दीनदयाल उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे प्रमुख नेते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रभक्तीची बीजे रोवली. त्यांच्या विचारांवरच पुढे भाजपची उभारणी झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, स्व. अटलबिहारी वाजपेयी, स्व. प्रमोद महाजन आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचाही त्यांनी उल्लेख केला. यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांवर भाजपची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या परिश्रमामुळे पक्षाला यश मिळाले असून राष्ट्रभक्तीच्या विचारातून समाजात राष्ट्रचेतना जागृत झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी असे प्रशिक्षण उपयुक्त ठरते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला चंद्रकांत फड, शांतीनाथ डोरले, अजय सवई, जगदीश गुरखुदे, शुभम धूत, नागेश तांबारे, सागर देशपांडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक शहराध्यक्ष अशोक लोढा यांनी केले, तर सूत्रसंचालन संगीता धसे यांनी केले.
चौकट
देशाला एकसंघ ठेवण्याचे कार्य जनसंघाने केले : प्रा.देविदास नागरगोजे
दुसऱ्या सत्राच्या मार्गदर्शन प्रसंगी प्रा.देविदास नागरगोजे यांनी सांगितले की, मी भाजपला अंतर-बाह्य ओळखतो. १०० वर्षांची परंपरा लाभलेला हा पक्ष आहे. देशाला एकसंघ ठेवण्यासाठी जनसंघाने कार्य केले. आज राज्यासह देशात भाजपची प्रचंड ताकद आहे. पंकजाताई मुंडे यांच्यासारखे बलाढ्य नेतृत्व आपल्या पाठीशी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात भाजपला ऐतिहासिक कामगिरी करायची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
चौकट
६ एप्रिल रोजी भाजपचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करा : शंकर देशमुख
मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी सांगितले की, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. अशा कार्यक्रमास मुख्यमंत्री, पंतप्रधान हे देखील कार्यकर्त्यांमध्ये बसून सहभागी होतात. ‘प्रथम राष्ट्र, द्वितीय पक्ष आणि नंतर स्वतः’ ही विचारसरणी पक्षाने रुजविली आहे. तसेच, येत्या ६ एप्रिल रोजी पक्षाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
चौकट
योजनांची माहिती प्रदर्शित
कार्यक्रमस्थळी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती फलकांद्वारे मांडण्यात आली होती. यामुळे योजनांचा प्रचार-प्रसार झाला. तसेच, पक्षाचा इतिहासही याठिकाणी प्रदर्शित करण्यात आला होता.
Back to top button