📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बस स्थानक गळतीच्या घटनेची घेतली आ.संदीपक्षीरसागरांनी दखल

बस स्थानक गळतीच्या घटनेची घेतली आ.संदीपक्षीरसागरांनी दखल
प्रत्यक्ष पाहणी करुन प्रशासनाला दिल्या सूचना
बीड दि.३ (प्रतिनिधी):- शहरात तब्बल १३ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या नव्या बसस्थानकाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून अवकाळी पावसात बसस्थानक गळू लागल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. याची आ. संदीप क्षीरसागर यांनी दखल घेत, शुक्रवारी (दि.३) सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रशासनाला तात्काळ दुरुस्ती करवून घेण्याच्या सूचना देत कंत्राटदाराचे कान टोचले आहेत.
               दि. १ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसात बसस्थानकाच्या छतातून पाणी गळू लागल्याने प्रतीक्षालयात पाणी साचले. त्यामुळे प्रवाशांना उभे राहणे व बसणेही कठीण झाले होते. काही ठिकाणी छतामधून थेट पाण्याची धार लागली होती. कोट्यवधी रुपये खर्च करून कामाचा दर्जा राखण्याबाबत काळजी घेतली नसल्याने ही घटना घडली आहे. पावसात चक्क छताला गळती लागल्याने नागरिकांना सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी शॉर्टसर्किट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यावेळी विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी ही परिस्थिती अधिक त्रासदायक ठरली होती. स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही अशी निकृष्ट कामे होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित ठेकेदार व विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याची दखल घेऊन आ.संदीप क्षीरसागर यांनी बसस्थानक परिसराची पाहणी करताना संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी त्वरित उपाययोजना करा. कामाच्या दर्जात कुठेही तडजोड झाल्यास जबाबदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी पाणी निचरा व्यवस्था, छताची दुरुस्ती आणि स्वच्छतेबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित विभागाने लवकरात लवकर आवश्यक दुरुस्ती करून प्रवाशांची गैरसोय दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, एस.टी. महामंडळ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Back to top button