बीड
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सवानिमित्त लेख

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सवानिमित्त लेख
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून मूल्याधिष्ठित शिक्षणाद्वारे चारित्र्य संवर्धन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, ‘शिक्षण मूल्याधिष्ठित असावे. बालकांच्या मनावर शिक्षणाचा प्रभाव योग्य प्रकारे झाला पाहिजे. शिक्षणाने त्याग, मानवता, विनम्रता, दुसर्यांची जाणीव, नैतिकता अशी मानवी मूल्ये विद्यार्थी मनावर रुजविली पाहिजे. जीवनाला मूल्यांची जोड असणे गरजेचे आहे. कारण मूल्य शिकविली जात नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये उपजत असलेल्या मूल्यांचा विकास केल्यास चारित्र्य संवर्धन होईल. उत्तम चारित्र्य असणारी व्यक्ती लोकशाहीचे खरे संरक्षक ठरतात.” शिक्षणाने वैचारिक क्षमतेचा व व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा ः शिक्षणामुळे व्यक्तीची वैचारिक क्षमता वृद्धिंगत होणे गरजेचे ठरते. शिक्षणामुळे बौद्धिक, मानसिक क्षमतेचा, अनुभव कक्षेचा विकास व्हावा, शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्वाला चालना मिळून व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला पाहिजे. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे आणि क्रांतीचे प्रभावी साधन : समाजात अनेक गैरसमज, अनिष्ट प्रथा, परंपरा असतात. समाजपरिवर्तनासाठी त्यांचा बिमोड करणे आवश्यक असते. वैचारिक क्रांती व समाजपरिवर्तनासाठी शिक्षणाचा वापर स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी झाला पाहिजे. सामाजिक व राष्ट्रीय प्रगतीसाठी प्रभावीपणे शिक्षण कार्यरत असले पाहिजे. महात्मा फुले, शाहू महाराज स्वतः बाबासाहेबांनी सामाजिक परिवर्तन, सामाजिक क्रांती करण्यासाठी शिक्षणाचा प्रभावी साधनांप्रमाणे वापर केला. महिला कल्याण व स्वातंत्र्याला शिक्षणाने गती मिळते : केंद्रीय मंत्री असताना, ‘हिंदू कोड बिल’ संसदेत मांडले. मात्र, संसदेत ते विधेयक फेटाळले गेल्याने मंत्रिपदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब असे उदाहरण जगाच्या इतिहासात महिला स्वातंत्र्याविषयी आढळून येत नाही. घटनेतील ‘कलम ३९(क)’नुसार उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री-पुरुष सर्वांना समान आहे. कलम ३९(ख) नुसार: सामाजिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल, अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचे स्वामित्व व नियंत्रण यांची विभागणी व्हावी. कलम ३९(घ) नुसार पुरुष व स्त्री या दोघांनाही समाज कामाबद्दल समान वेतन मिळावे. कलम ३९(ड) नुसार श्रमिक स्त्री व कोवळ्या मुलांचे शोषण होऊ नये. कलम ३९(च) नुसार स्त्री, बालक आणि युवकांना शोषणापासून आणि जैविक आणि भौतिक गरजांच्या बाबतीत आवश्यक संरक्षण दिले जावे. कलम ४२ नुसार कामांबाबत न्याय, मानवीय परिस्थिती, प्रसूतीविषयक साहाय्य उपलब्ध करण्यात येईल. शिक्षणाने स्त्री-स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त होईल. यावर बाबासाहेबांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे त्यांनी संविधानिक तरतूद करून स्त्री-शिक्षण, अधिकार, स्त्री-संरक्षण यांना कायदेविषयक चौकट निर्माण केली व स्त्रीमुक्ततेचा मार्ग प्रशस्त केला. आज स्त्री पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात अधिकार संपन्नतेने संचार करत आहे, ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचीच फलनिष्पत्ती असून सोमवार दि.१४ एप्रिल २०२५ रोजी संपन्न होत असलेल्या १३४ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम………!!!!
प्रा. धनवंत नानासाहेब मस्के
बीड



