पुस्तके विचारांना आवाज देऊन जग बदलण्याची शक्ती देतात — डॉ. बबन जोगदंड

बीड (दि.१२) – पुस्तके गप्प असतात, पण ती वाचणाऱ्याला केवळ ज्ञानच देत नाहीत तर त्याच्या विचारांना आवाज देऊन त्याला समाजात परिणामकारक बनवतात, जग बदलण्याची शक्ती देतात, असे प्रतिपादन पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) चे अधिकारी, लेखक तथा पत्रकार डॉ.बबन जोगदंड यांनी व्यक्त केले.
येथील तुलसी शैक्षणिक समूहाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे १८ तासांचा अभ्यास उपक्रम आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी डॉ.जोगदंड यांनी वाचनाच्या सामाजिक-शैक्षणिक भूमिकेवर प्रकाश टाकला.यावेळी देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक कांबळे साहेब, प्रा.अर्जुन राठोड आदी उपस्थित होते.
डॉ.जोगदंड यांनी विद्यार्थ्यांना उद्देशपूर्ण संदेश देताना म्हटले आहे की, जगण्यासाठी दिशा हवी, आणि दिशेसाठी ध्येय हवं. केवळ किती अंतर पार केलं यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने प्रवास करत आहात हे अधिक महत्त्वाचं आहे. दिशाहीन जीवनाला काही अर्थ नाही.त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनाचे स्पष्ट ध्येय ठेवून, त्याच्या दिशेने एकाग्रतेने कार्य केले पाहिजे. फक्त चालत राहण्यापेक्षा योग्य मार्गावर चालणे निर्णायक ठरते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत त्यांच्या वडिलांनी दिलेले पाच संस्कार अतिशय महत्त्वाचे होते. शिक्षण, शिस्त, स्वावलंबन, स्वाभिमान आणि मेहनत या संस्कारांमुळेच बाबासाहेब यशस्वी झाले. प्रत्येक विद्यार्थ्याने या संस्कारांना आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण तेच खऱ्या अर्थाने यशाचा पाया आहेत, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रदीप रोडे यांनी केले, तर आभार प्रा.विवेक जोगदंड यांनी मानले. कार्यक्रमास तुलसी समूहातील सर्व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



