ल.ना.होशिंग विद्यालयात भव्य क्रिकेट स्पर्धा उत्साहात खेळांमधून करिअर घडते; विद्यार्थ्यांनी व्यायामाची सवय लावावी – डॉ. सुनील नरके

ल.ना.होशिंग विद्यालयात भव्य क्रिकेट स्पर्धा उत्साहात
खेळांमधून करिअर घडते; विद्यार्थ्यांनी व्यायामाची सवय लावावी – डॉ. सुनील नरके
जामखेड प्रतिनिधी: खेळांमधून अनेक विद्यार्थ्यांचे करिअर घडले आहे. व्यायाम न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आजपासून व्यायामाची सवय लावावी,असे प्रतिपादन जामखेड महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुनील नरके यांनी केले.
दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ल.ना. होशिंग विद्यालयात भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सकाळच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला दिमाखदार स्वरूप प्राप्त झाले.
जामखेड महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुनील नरके, जि.प. मराठी मुले शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर अहिरे, मराठी मुली शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय यादव तसेच विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, उपप्राचार्य युवराज भोसले, पर्यवेक्षक अनिल देडे, कार्यालयीन अधीक्षक ईश्वर कोळी, बाबासाहेब धनवडे,पांडुरंग वराट, राजेंद्र कोहक, विश्वनाथ आघाव, बबन राठोड, पोपट जगदाळे, मुकुंद राऊत, बाबासाहेब समुद्र आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना डॉ. नरके यांनी सांगितले की, नुकताच
जिल्हास्तरावर जामखेड महाविद्यालयाला क्रीडा पुरस्कार मिळाला असून हे यश गुणी खेळाडूंमुळेच शक्य झाले आहे.
प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी विद्यार्थ्यांना खेळांच्या माध्यमातून शारीरिक विकास साधण्याचे आवाहन करताना सांगितले की, खेळामुळे अभ्यासातही प्रगती होते व जीवनाला योग्य दिशा मिळते.
स्पर्धेत इयत्ता पाचवी ‘अ’ व ‘ड’ तसेच ‘ब’ व ‘क’ यांच्यात चुरशीचे सामने रंगले. अनेक शिक्षकांनी बक्षिसे ठेवली होती. विजेत्या संघाला ११०० रुपये, तर उपविजेत्या संघाला ७०१ रुपये बक्षीस देण्यात आले. मान्यवरांनी क्रीडा विभागाच्या कार्याचे कौतुक केले.
स्पर्धेचे नियोजन क्रीडा विभाग प्रमुख राघवेंद्र धनलगडे, प्रल्हाद साळुंके, धीरज पाटील, बाप्पू जरे यांनी केले. पंच म्हणून रोहित घोडेस्वार व उमाकांत कुलकर्णी यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली, तर संतोष देशमुख यांनी समालोचनाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. पंकज पोकळे, साई भोसले व स्वप्निल जाधव यांनी फोटो व व्हिडिओद्वारे या स्पर्धेच्या आठवणी जतन केल्या.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला.स्पर्धेसाठी शिक्षक विशाल पोले, आदित्य देशमुख, लक्ष्मण सोळंके, हनुमंत वराट, निलेश भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.



