बीड

शिवसंवाद दौऱ्यातील माणुसकीचा स्पर्श! दुःखाच्या डोंगराखाली दबलेल्या सय्यद कुटुंबाला डॉ. श्रीकांत शिंदे यांचा आधार

शिवसंवाद दौऱ्यातील माणुसकीचा स्पर्श! दुःखाच्या डोंगराखाली दबलेल्या सय्यद कुटुंबाला डॉ. श्रीकांत शिंदे यांचा आधार

केज | प्रतिनिधी
मराठवाड्यातील ४५ ते ४६ अंश सेल्सिअसच्या रखरखत्या उन्हात शिवसेनेचा ‘शिवसंवाद दौरा’ सुरू आहे. अंगाची लाही-लाही करणाऱ्या उष्णतेची पर्वा न करता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे राज्यभरातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. शाखाप्रमुखांपासून ते जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांच्याशी भावनिक नाते जोडणे, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे.
अशाच दौऱ्यादरम्यान गुरुवारी केज येथे आयोजित आढावा बैठकीत एक हृदयद्रावक घटना घडली. रसूल गफूर सय्यद हे आपल्या कुटुंबावर ओढवलेल्या आर्थिक संकटाबाबत निवेदन देण्यासाठी बैठकीच्या ठिकाणी आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाल्याने कुटुंब आधीच मोठ्या दुःखातून जात होते. त्या वेदनेतून मार्ग शोधण्यासाठी ते आशेने आले होते. मात्र नियतीने वेगळाच घात केला. बैठकीपूर्वीच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थितांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि युवासेना निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना परिस्थितीची कल्पना दिली. पुढील कार्यक्रमांचे नियोजन, दौऱ्याची व्यस्तता आणि राजकीय जबाबदाऱ्या बाजूला ठेवत डॉ. शिंदे यांनी थेट सय्यद कुटुंबाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. घरात शोककळा पसरली होती. काही दिवसांतच मुलगा आणि आता कुटुंबप्रमुख अशा दुहेरी आघाताने कुटुंब पूर्णपणे खचले होते. अशा कठीण प्रसंगी डॉ. शिंदे यांनी कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले, त्यांना धीर दिला आणि त्यांच्या दुःखात सहभागी झाले. केवळ सांत्वन करून न थांबता त्यांनी सय्यद कुटुंबासाठी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. यासोबतच कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही शिवसेना उचलेल, अशी आश्वासक ग्वाही दिली.
दुःखाच्या काळोखात आशेचा किरण ठरलेल्या या मदतीमुळे कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये आधार मिळाल्याची भावना देखील होती. मराठवाड्याच्या तप्त भूमीवर सुरू असलेल्या शिवसंवाद दौऱ्यातील हा प्रसंग केवळ एका राजकीय नेत्याच्या भेटीचा नव्हता; तो माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा जिवंत अनुभव होता. कारण नेतृत्वाची खरी ओळख व्यासपीठावरील भाषणांतून नव्हे, तर संकटाच्या क्षणी दुःखी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यातून होत असते.
—–
*चौकट-*
*खा. डॉ श्रीकांत शिंदे यांची जिव्हाळ्याची भूमिका*
पक्ष, राजकारण, स्वार्थ आणि उर्वरित दौऱ्यातील बैठका बाजूला सारून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सय्यद कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि मदतीचा हात दिला. त्यांच्या या कृतीतून बीड जिल्हावासियांना माणुसकीचे विराट दर्शन घडले. संकटाच्या काळात एका दुःखी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांनी संवेदनशील नेतृत्वाचा आदर्श निर्माण केला. डॉ. शिंदे यांच्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संस्कार स्पष्टपणे दिसून आले. शिवसेनेची माणुसकीची परंपरा त्यांनी कृतीतून जपली आहे. त्यांच्या या मदतीमुळे सय्यद कुटुंबाला मोठा आधार मिळाला. समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि आपुलकी त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केली. अशा नेतृत्वामुळे सामान्य माणसाचा राजकारणावरील विश्वास अधिक दृढ होतो. असे मत शिवसेना-युवसेनेच्या वतीने बीड जिल्हा संपर्काप्रमुख मनोज शिंदे, जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक, जिल्हाप्रमुख स्वप्नील भैय्या गलधर, युवा सेना निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी व्यक्त करत डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
°°°°°
Back to top button