📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

अंबाजोगाईसाठी आणखी ६६ घरकुलांना मंजुरी; नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश

अंबाजोगाईसाठी आणखी ६६ घरकुलांना मंजुरी; नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश
अंबाजोगाई प्रतिनीधी बालाजी देशमुख;नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंजुरी आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत अंबाजोगाई शहरासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणखी ६६ घरकुलांना अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. शहरातील सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून, नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.
यापूर्वी शहराची धुरा हाती घेतल्यानंतर नंदकिशोर मुंदडा यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच ७१ घरकुले मंजूर करून आणली होती. त्यानंतर आता नव्याने आणखी ६६ घरकुलांना मंजुरी मिळवून देण्यात त्यांना मोठे यश आले आहे. या दोन्ही टप्प्यांमुळे शहरातील अनेक गरीब आणि गरजू कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. ६ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून १७ ऑगस्ट २०२६ रोजी याचे अधिकृत कार्यालयीन ज्ञापन काढण्यात आले आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मंत्री पंकजाताई मुंडे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि आमदार नमिता मुंदडा यांचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी आभार मानले आहेत.
शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच तळागाळातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यावर नंदकिशोर मुंदडा यांनी नेहमीच भर दिला आहे. केवळ पोकळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. घरकुल योजनेच्या प्रस्तावांपासून ते अंतिम मंजुरीपर्यंत प्रशासकीय पातळीवर त्यांनी जातीने लक्ष घालून पाठपुरावा केला. त्यांच्या या धडाडीच्या कार्यपद्धतीमुळे आणि गरिबांप्रती असलेल्या बांधिलकीमुळे अंबाजोगाईकरांना मोठा दिलासा मिळाला असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. याकामी त्यांना शासन पातळीवर आमदार नमिता मुंदडा यांचे मोठे सहकार्य लाभत आहे.
Back to top button