बीड

खेड तालुक्यातील व्यायामशाळा आणि ओपन जिमना बळ ३५ लाखांचा निधी मंजूर!

खेड तालुक्यातील व्यायामशाळा आणि ओपन जिमना बळ ३५ लाखांचा निधी मंजूर!

आमदार बाबाजी काळे यांच्या प्रयत्नांना यश नागरिकांच्या आरोग्यदायी उपक्रमांना चालना!

सुहास सावंत / पुणे, खेड

जिल्हा वार्षिक योजनेत सन २०२५-२६ अंतर्गत क्रीडा विभागाने खेड तालुक्यातील व्यायामशाळा साहित्य व ओपन जिम साहित्य बसविण्यासाठी एकूण ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेतून ग्रामीण भागातील युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांना व्यायामासाठी सुलभ साधनसामग्री उपलब्ध होणार आहे.

सदर निधीमधून खेड तालुक्यातील पाच ठिकाणी आधुनिक ओपन जिम बसविण्यात येणार असून त्यामध्ये खालील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
खरपूड ग्रामपंचायत येथे ओपन जिम पुरवठा ₹७ लाख
धामणे ग्रामपंचायत येथे ओपन जिम पुरवठा ₹७ लाख, राजगुरुनगर पोलीस स्टेशन परिसरात ओपन जिम पुरवठा ₹७ लाख, मांगरवाडी (संयुक्त ग्रामपंचायत) येथे ओपन जिम पुरवठा ₹७ लाख, गिरोली ग्रामपंचायत येथे ओपन जिम पुरवठा ₹७ लाख
या योजनेमुळे ग्रामीण भागातील तरुणाईला आरोग्यदायी वातावरणात व्यायामाची सुविधा मिळणार असून क्रीडा संस्कृती अधिक बळकट होईल. सकाळ-संध्याकाळ व्यायामासाठी नागरिकांना सुरक्षित आणि आकर्षक ओपन स्पेस उपलब्ध होणार आहे.
खेड तालुक्यातील अनेक ठिकाणी आरोग्य व क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रयत्न करणारे आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना प्रत्यक्षात येत आहे. त्यांनी वेळोवेळी जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा करून ही मागणी मंजूर करून घेतली.
याबाबत आमदार काळे म्हणाले “सुदृढ शरीर हेच बलशाली समाजाचे प्रतीक आहे. खेड तालुक्यातील तरुणाई व नागरिकांना ओपन जिम सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती. या माध्यमातून लोकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश पोहोचेल.”
खेड, धामणे, राजगुरुनगर, मांगरवाडी आणि गिरोली या ठिकाणी लवकरच जिम साहित्य बसविण्याची प्रक्रिया सुरू होणार असून नागरिकांमध्ये या उपक्रमाबद्दल उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील क्रीडा आणि आरोग्य क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून “आरोग्यदायी खेड सशक्त खेड” हा संकल्प प्रत्यक्षात उतरणार आहे.

Back to top button