बीड
पीक विम्यातून बीडला वगळल्याप्रकरणी मंत्रालयात विशेष बैठक; आ. विजयसिंह पंडित यांच्या मागणीला कृषीमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

पीक विम्यातून बीडला वगळल्याप्रकरणी मंत्रालयात विशेष बैठक; आ. विजयसिंह पंडित यांच्या मागणीला कृषीमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
मुंबई / गेवराई : बीड जिल्ह्याला पीक विमा योजनेतून वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. आमदार विजयसिंह पंडित यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आक्रमक भूमिका मांडत कृषीमंत्र्यांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. यावर कृषीमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.
बैठकीत अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाचे तात्काळ वाटप करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये प्रति हेक्टर ८,५०० ते १७,५०० रुपयांच्या मदतीचे वितरण लवकर करण्यात यावे, अशी आग्रही भूमिका आ. पंडित यांनी मांडली. तसेच सन २०२६-२७ च्या पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पूर्वीचे निकष (ट्रिगर्स) पुन्हा लागू करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. या विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. उमापूर परिसरातील १,५६२ शेतकऱ्यांचे विमा प्रलंबित असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असूनही संबंधित बँकांकडून कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. यावर कृषीमंत्र्यांनी तातडीने कारवाईचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मिळाली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार विजयसिंह पंडित यांच्या भूमिकेचे परिसरात स्वागत होत आहे.



