बीड

चकलांबा पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन इंगळे यांच्या बदलीची मागणी; अवैध धंद्यांना संरक्षणाचा आरोप

चकलांबा पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन इंगळे यांच्या बदलीची मागणी; अवैध धंद्यांना संरक्षणाचा आरोप
————————————
पोलीस अधीक्षक यांच्या जवळचे असल्याने कारवाई न करण्यावर ठाम
—————————————————————–
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस स्टेशनच्या परिसरात अवैध धंदे पुन्हा डोके वर काढत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांमधून केला जात आहे. दारू, मटका, गुटखा तसेच अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उपशामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चर्चा सुरू आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, चकलांबा पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन इंगळे यांच्या तीन महिन्याच्या कार्यकाळात अवैध व्यवसायांना आळा बसण्याऐवजी ते अधिक वाढल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी दिवसाढवळ्या अवैध व्यवहार सुरू असून संबंधितांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
तसेच “वरिष्ठांशी जवळीक असल्याने आमचे कोणी काही करू शकत नाही,” अशा प्रकारची भूमिका काही जणांकडून घेतली जात असल्याचेही नागरिक सांगत आहेत. त्यामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, वाढती गुन्हेगारी, अवैध वाळू उपसा, मटका, दारू आणि गुटखा विक्रीमुळे युवकांवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकारांची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
चौकट…..
“अवैध धंद्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न”
चकलांबा परिसरात अवैध धंदे वाढत असल्याने ग्रामीण भागातील शांतता धोक्यात आली आहे. प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Back to top button