बीड
बीड जिल्हा रुग्णालयातील प्रसुती दरम्यान हलगर्जीपणामुळे गोरगरीबांचे जीव घेणा-या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पाठराखण करणा-या डॉ . सतिशकुमार सोळंके यांना निलंबित करा ! दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून सनद रद्द करा ! सोमवारी जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलनाचा इशारा :- डॉ.गणेश ढवळे

बीड जिल्हा रुग्णालयातील प्रसुती दरम्यान हलगर्जीपणामुळे गोरगरीबांचे जीव घेणा-या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पाठराखण करणा-या डॉ . सतिशकुमार सोळंके यांना निलंबित करा ! दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून सनद रद्द करा ! सोमवारी जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलनाचा इशारा :- डॉ.गणेश ढवळे
बीड : (दि. २०) बीड जिल्हा रुग्णालयातील माता व बाल रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांच्या उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणाच्या घटना समोर येत असून, त्यामध्ये रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे. या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधितांची पाठराखण करत असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिशकुमार सोळंके यांचे निलंबन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. सुमारे २४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या माता व बाल रुग्णालयात उपचारादरम्यान महिलांच्या मृत्यू व गंभीर प्रकृतीच्या घटना घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात शेख मुस्कान यांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर आता वडवणी येथील १९ वर्षीय संध्या सुरज गायकवाड यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या पोटात वैद्यकीय हातमोजे व सर्जिकल कापड राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर संसर्ग झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. ढवळे यांनी म्हटले आहे. संसर्गामुळे आतडे व गर्भाशय काढण्याची वेळ आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
या घटनांबाबत सखोल चौकशी करून नेमकी जबाबदारी निश्चित करावी, दोषी आढळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच वैद्यकीय क्षेत्रातील नियमांनुसार त्यांच्या परवान्याबाबतही योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वीच्या घटनांचीही चौकशी करा
बीड जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल महिलांच्या मृत्यूच्या यापूर्वीच्या घटनांमध्ये छाया गणेश पांचाळ आणि मुस्कान शेख यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनांनंतर नातेवाईक तसेच सामाजिक संघटनांकडून निवेदने व आंदोलनांच्या माध्यमातून कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र, चौकशीच्या नावाखाली विलंब होत असल्याचा आरोप डॉ. ढवळे यांनी केला आहे.
परभणी जिल्ह्यात गर्भवती महिलेला १०८ रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने उपचारास विलंब झाल्याच्या प्रकरणानंतर तेथील जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, असा दाखला देत बीडमधील प्रकरणातही जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निलंबनाची मागणी
जिल्हा रुग्णालयातील वारंवार घडणाऱ्या कथित हलगर्जीपणाच्या घटनांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. संबंधित प्रकरणांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी होईपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिशकुमार सोळंके यांना निलंबित करावे, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी बीड जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा डॉ. गणेश ढवळे यांनी दिला आहे.
डॉ.गणेश ढवळे, लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२



