📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आदर्श मराठी शाळा वेळास येथे लोकसहभागाची क्रांती; दीड लाख रुपये खर्चाचे पेव्हर ब्लॉकचे काम पूर्ण!

आदर्श मराठी शाळा वेळास येथे लोकसहभागाची क्रांती; दीड लाख रुपये खर्चाचे पेव्हर ब्लॉकचे काम पूर्ण!
​विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांचा स्तुत्य पुढाकार
​वेळास (संदेश घोलप):
ग्रामीण भागातील शाळांचा कायापालट करण्यासाठी लोकसहभाग किती महत्त्वाचा ठरू शकतो, याचे उत्तम उदाहरण श्रीवर्धन तालुक्यातील आदर्श मराठी शाळा, वेळास येथे पाहायला मिळाले आहे. शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक सुरक्षित व्हावा या उदात्त उद्देशाने लोकसहभागातून तब्बल १ लाख ५० हजार रुपये खर्चाचे पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे.
​दरवर्षी पावसाळ्यात शाळेच्या प्रांगणात चिखल व पाण्याचे साम्राज्य निर्माण होत असल्याने लहानग्या विद्यार्थ्यांना, तसेच शिक्षकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गंभीर समस्या ओळखून शाळा व्यवस्थापन समितीचे तत्पर सदस्य श्री. धवल तवसाळकर यांनी पुढाकार घेतला आणि आपल्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने हे काम प्रत्यक्ष मार्गी लावले.
​या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात वेळासचे माजी उपसरपंच श्री. सुरेश धोपट, श्री. तेजस दळवी आणि श्रिया शैलेश कासेकर यांनी मोलाचे आर्थिक व प्रत्यक्ष सहकार्य दिले. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शाळा परिसराचे रूपच बदलून गेले असून शाळेच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे.
​मुख्याध्यापकांकडून आभार व्यक्त
ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी इतर शाळांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत शाळेचे मुख्याध्यापक श्री. सतीश शिकारे यांनी शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने सर्व दात्यांचे व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. लोकसहभागातून झालेल्या या कार्याचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.

Back to top button