बीड
रानवलीचा रायगडात डंका!‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात’ जिल्ह्यात प्रथम क्रमांक; ५० लाखांच्या बक्षीसावर ठोकला मोहर!

रानवलीचा रायगडात डंका!‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात’ जिल्ह्यात प्रथम क्रमांक; ५० लाखांच्या बक्षीसावर ठोकला मोहर!
खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचा विशेष गौरव; “हे देदीप्यमान यश संपूर्ण रानवली परिवाराचे” – खा. तटकरे
श्रीवर्धन (संदेश घोलप)
विकासकामांचा ध्यास, प्रशासकीय शिस्त आणि पारदर्शक कारभाराच्या जोरावर श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायतीने इतिहास घडवला आहे. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात’ रानवलीने संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून आपल्या यशाची मोहोर उमटवली आहे. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे लोकनेते तथा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते रानवली ग्रामपंचायतीचा विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला.
आयोजित विशेष सोहळ्यात खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
‘एकजुटीतून साकारले यशाचे मॉडेल!’ — खा. तटकरे
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना खासदार तटकरे यांनी रानवलीच्या विकासप्रवासाचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले,
”हा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा बहुमान केवळ एका व्यक्तीचा किंवा पदाचा नसून, रानवलीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येक ग्रामस्थाचा, सर्व लोकप्रतिनिधींचा आणि रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा आहे. सर्वांच्या एकजुटीतूनच हे देदीप्यमान यश शक्य झाले आहे.”
यशाची प्रमुख ४ सूत्रे:
रानवली ग्रामपंचायतीने केवळ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्षात जमिनीवर उतरवून दाखवलेल्या कामांमुळे हा बहुमान मिळाला आहे:
पारदर्शक व डिजिटल प्रशासन: ग्रामस्थांना सर्व दाखले आणि सेवा त्वरित व ऑनलाईन उपलब्ध.
उत्कृष्ट जलव्यवस्थापन व स्वच्छता: पाणीटंचाईवर मात आणि सुंदर, स्वच्छ गावाचा वस्तुपाठ.
शासकीय योजनांची १००% अंमलबजावणी: योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यात यश.
सक्रिय लोकसहभाग: गावातील प्रत्येक निर्णयात आणि कामात ग्रामस्थांचा थेट सहभाग.
श्रीवर्धन तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
लोकप्रतिनिधींचा दूरदृष्टीकोन, कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि ग्रामस्थांची खंबीर साथ या ‘त्रिवेणी संगमातून’ रानवलीने जिल्ह्यासमोर विकासाचा आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे. या ऐतिहासिक यशामुळे श्रीवर्धन तालुक्याची मान अभिमानाने उंचावली असून, संपूर्ण रायगड जिल्ह्यातून ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी, सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



