बीड

महावितरणचा उत्कृष्ट तांत्रिक पुरस्कार शेख अखिल उस्मान यांना

महावितरणचा उत्कृष्ट तांत्रिक पुरस्कार शेख अखिल उस्मान यांना
माजलगावच्या वरिष्ठ तंत्रज्ञाचा सन्मान उल्लेखनीय कार्याची दखल
 माजलगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) लातूर परिमंडळाकडून उत्कृष्ट तांत्रिक कार्याची दखल घेत माजलगाव उपविभागातील माजलगाव शहर शाखा-२ येथे कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ शेख अखिल उस्मान यांना यावर्षीचा “उत्कृष्ट तांत्रिक पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
शेख अखिल उस्मान यांनी आपल्या सेवाकाळात वीज वितरण व्यवस्थेची गुणवत्ता उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. दुर्गम भागातही अखंडित वीजपुरवठा राखण्यासाठी त्यांनी वेळेची पर्वा न करता परिश्रम घेतले आहेत. तांत्रिक अडचणींवर तात्काळ मात करत ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे वीज खंडित होण्याच्या घटनांमध्ये घट झाली असून ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, जबाबदारीची जाणीव आणि तांत्रिक कौशल्याचे विशेष कौतुक केले. आव्हानात्मक परिस्थितीतही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावून विभागाची प्रतिमा उंचावण्यात मोलाचा वाटा उचलल्याचे त्यांनी नमूद केले.
लातूर येथे मा. मुख्य अभियंता श्री बुलबुले साहेब व मा. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री चुनारकर साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्त माजलगाव उपविभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी शेख अखिल उस्मान यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Back to top button