
नांदूरघाटच्या सरपंच सुनिता जाधव सरपंच पदावरून अपात्र
*विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय : १ कोटी ३ लाखांच्या अपहार प्रकरणात कारवाई*
* नांदुर घाट प्रतिनिधी. श्रीकांतराजेजाधव : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नांदूरघाट (ता. केज, जि. बीड) येथे झालेल्या रस्ते कामांमधील कथित अपहार प्रकरणात विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी मोठा निर्णय दिला आहे. ग्रामपंचायत नांदूरघाटच्या सरपंच श्रीमती सुनिता युवराज जाधव यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये सरपंच पदावरून सांप्रत कालावधीसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत (भा.प्र.से.) यांनी दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी हा अंतिम आदेश पारित केला आहे. प्रकरण क्र. ११८/२०२६ मध्ये हा निर्णय देण्यात आला.
*काय आहे प्रकरण ?*
ग्राम रोजगार सेवक शेख सादिक दिलावर (रा. नांदूरघाट) यांनी सरपंच सुनिता जाधव यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांनी त्यानुसार चौकशी करून अहवाल सादर केला होता.
चौकशी अहवालानुसार :
– मनरेगा अंतर्गत नांदूरघाट येथे एकूण २६ रस्ते कामे करण्यात आली.
– त्यापैकी १३ रस्ते कामांच्या मोजमाप पुस्तिका (मेजरमेंट बुक) आढळून आल्या नाहीत, उपलब्ध करून दिल्या नाहीत.
– ८ रस्त्यांवर कसलेही काम न होता खर्च नोंदविला गेला. त्यावरील उचललेली अकुशल + कुशल रक्कम रुपये ५९,४६,४१३/- वसुलपात्र ठरते.
– १२ रस्ते कामांवर वितरित झालेली अकुशल + कुशल रक्कम व त्यावर झालेला प्रत्यक्ष खर्च यामधील तफावत रुपये ४४,४३,०६७/- ही वसुलपात्र ठरते.
– एकूण रुपये १,०३,८९,४८०/- इतक्या रक्कमेचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले.
*सरपंचांनी ३३ लाख भरले – पण अपात्रता टळली नाही*
या प्रकरणात सरपंच सुनिता जाधव यांनी दिनांक २८/०८/२०२६ रोजी रुपये २२,००,०००/- व रुपये ११,१५,१४७/- असे एकूण रुपये ३३,१५,१४७/- ग्रामपंचायत खात्यावर जमा केले होते. मात्र, विभागीय आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, ही रक्कम जमा केल्याने अपहार मान्य असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अपात्रतेची कारवाई आवश्यक आहे.
सरपंचांच्या वतीने फेरचौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र कामाचे फोटो वगळता देयकांच्या छायाप्रती, मोजमाप पुस्तिकेच्या छायाप्रती, काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र यासारखे कोणतेही पुरावे सादर केले नाहीत, असे आदेशात नमूद केले आहे.
*आदेशातील इतर महत्त्वाचे मुद्दे :*
१) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड यांचा दिनांक ०३/०९/२०२६ चा चौकशी अहवाल मान्य करण्यात येतो.
२) सरपंच सुनिता युवराज जाधव यांना हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर व सार्वजनिक निधीचा अपहार केल्यामुळे सरपंच पदावरून सांप्रत कालावधीसाठी अपात्र घोषित करण्यात येते.
३) प्रकरणात जबाबदार तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी, शाखा अभियंता यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ पोटकलम (४) मधील तरतुदीनुसार प्रस्तावित निलंबनाची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी.
४) प्रकरणात जबाबदार ग्रामरोजगार सेवक, तांत्रिक अधिकारी व C.D.E.O. यांच्याविरुद्ध प्रस्तावित केलेली कारवाई पूर्ण करावी.
५) दोषी असणाऱ्या पदाधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून अपहारित रक्कम रुपये १,०३,८९,४८०/- सर्व संबंधितांकडून व्याजासह वसूल करून शासनखाती भरणा करण्याची व प्रस्तावित फौजदारी गुन्ह्याबाबतची कारवाई पूर्ण करावी.
६) सदरील आदेश सर्व संबंधितांना कळविण्यात यावा व तात्काळ अंमलबजावणी करावी.
या निर्णयामुळे केज तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नांदूरघाट ग्रामपंचायतीच्या कारभारावर आता प्रशासनाचे लक्ष लागले आहे.



