बीड

जामखेडमध्ये मोकाट जनावरांवर नगरपरिषदेची धडक कारवाई जनावरे मोकाट सोडाल ,तर दंड ठोकू – मुख्याधिकारी साळवेंचा इशारा

जामखेडमध्ये मोकाट जनावरांवर नगरपरिषदेची धडक कारवाई

जनावरे मोकाट सोडाल ,तर दंड ठोकू – मुख्याधिकारी साळवेंचा इशारा

जामखेड (प्रतिनिधी) –शहरातील रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट जनावरांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या जनावरांमुळे वाहनचालक, भाजी विक्रेते, तसेच शाळकरी विद्यार्थी यांना दररोज अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, जनावरांचे मालक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने अखेर जामखेड नगरपरिषदेला कारवाईचा मार्ग पत्करावा लागला.

नगरपरिषदेने आज (२७ जुलै) सकाळपासून शहरातील विविध ठिकाणी मोहीम राबवत सुमारे १५ ते २० मोकाट जनावरे ताब्यात घेतली. यामध्ये बाजारतळ, खर्डा रोड, बीड रोड, मार्केट यार्ड, मुख्य चौक आदी गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात आले. या कारवाईदरम्यान चार जनावरांचे मालक आढळून आले नसल्याने संबंधित जनावरे साकत येथील गोशाळेत हलवण्यात आली आहेत.

या कारवाईची पुढील टप्प्यात अधिक तीव्र रूपात अंमलबजावणी केली जाणार आहे. उद्या (दि. २८ जुलै) पासून शहरात रिक्षा फिरवून जनजागृती करण्यात येणार असून,जनावरे मोकाट सोडाल ,तर दंड ठोकू, तसेच कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी अजय साळवे यांनी दिला आहे. नागरिकांनी आपल्या जनावरांची जबाबदारी घ्यावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.

कारवाईदरम्यान नगरपरिषदेचे आरोग्य व पाणीपुरवठा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर मिसाळ, लिपिक प्रणित सदाफुले, मुकादम बाळू काळे, आरोग्य कर्मचारी बाळू लांडगे, कल्याण काळे, सतिश कंगने, आण्णा लोखंडे, भास्कर लोंढे, विजय जाधव, तानाजी घायतडक, तन्वीर सय्यद, विशाल जाधव आदींनी सहभाग घेतला.

नगरपरिषदेच्या या कारवाईसाठी नागरिकांतून समाधान व्यक्त होत असले तरी ही कारवाई नियमित आणि काटेकोर राहील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button