म्हसळा ते माणगाव या पट्ट्यात राहणाऱ्या ग्रामस्थांची /प्रवाशांची एस. टी. गाड्यांसाठी होणारी परवड.

म्हसळा ते माणगाव या पट्ट्यात राहणाऱ्या ग्रामस्थांची /प्रवाशांची एस. टी. गाड्यांसाठी होणारी परवड.
विशेष प्रतिनिधी : नंदकुमार चांदोरकर
सकाळी 10.30 ते 11 वाजता म्हसळा अथवा चांदोरे वरुन कामासाठी माणगावला गेलेल्या लोकांना गाड्यांच्या अनुपलब्धतेमुळे दुपारी 3 ते 4 इतक्या प्रदीर्घ वेळेपर्यंत स्थानकावर नाईलाजाने ताटकळत उभे रहावे लागते. एवढ्या दीर्घ वेळात ‘माणगाव -म्हसळा ‘हीं लोकल एस. टी. क्वचितच सोडली जाते. बाकी मुंबईवरून येणाऱ्या श्रीवर्धन गाडीवर एस.टी. वाल्यांची आणि प्रवाशांची भिस्त असते. आजकाल कायमच रहदारीचा प्रश्न, एनकेन प्रकारे बिकट झाल्याने मुंबई -श्रीवर्धन म्हणजे श्रीवर्धन ला जाणाऱ्या गाड्या उशिराने येतात त्यामुळे या पंचक्रोशीतील (27 किलोमीटर परिसरातील )विद्यार्थ्यांचे चांदोरे, साई गावावरून येणाऱ्या, कामासाठी बाजारासाठी येणाऱ्या महिलांचे जेष्ठ नागरिकांचे अतोनात हाल होतात. मुंबईहून चांदोरे-म्हसळा, श्रीवर्धनला जाण्यासाठी दुसऱ्या गाड्या पकडून आलेले प्रवासी हार्डवेअरचे आणि इतर सामान आणण्यासाठी गेलेले, सरकारी कार्यालयात, तहसीलदार आणि तलाठी कार्यालयात कामानिमित्त,विविध व्याधीमुळे इस्पितळात जाणारे,कोर्टकचेऱ्याना हजेरी लावणारे अशा विविध प्रकारच्या, प्रवाशांचा यात समावेश असतो. ही मंडळी तास दीड तासात आपापली कामे उरकून परत जाण्यासाठी माणगाव स्थानकावर ताटकळत गाड्यांची प्रतीक्षा करीत असतात. श्रीवर्धनला जाणारी गाडी आल्यावर तरणी ताठी मंडळी पटकन मुसंडी मारून पुढे घुसतात. वयोवृद्ध आणि महिला मागेच राहतात. चौकशीसाठी गेलेल्या व्यक्तींच्या अंगावर डाफरले जाते. उलट, उर्मट उत्तर दिली जातात. या पार्श्वभूमीवर माणगाव ते गोरेगाव यादरम्यानची वाहतूक व्यवस्थित सुरू असते. अर्धा एक तासाच्या अंतराने नियमितपणे गाड्या सोडल्या जातात. गोरेगावला जायला दर तासाने गाडी उपलब्ध आहे, तर माणगाव साठी का नाही? हे विचारण्यासाठी गेलेल्यांना माणगाव- गोरेगाव मार्गावर घाट नाही, असे निर्लज्ज पण खरेखुरे उत्तर दिले जाते. माणगाव- म्हसळा मार्गावर खाजगी वाहनातून जाण्यासाठी दरडोई 70 रुपये मोजावे लागतात कोकणातील गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांना हे अव्वाच्या सव्वा दर कसे बरे परवडणार? प्रत्येक तासाला, दीड तासाला वेळेवर जर माणगाव – म्हसळा स्थानिक गाडी (लाल परी )जर प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली तर या सगळ्या प्रवाशांची परवड थांबेल,
‘ प्रवाशांच्या सोयीसाठी ‘ ‘गाव तेथे एस.टी.’ हे बिरुद सार्थपणे आणि समर्थपणे मिरवण्याचा अभिमान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास लाभेल व शेकडो प्रवाशांचे मनापासून दुवा/ आशीर्वाद ही लाभतील.
एस. टी. महामंडळास प्रवाशांची कळकळेची विनंती आहे कि माणगाव म्हसळा/श्रीवर्धन या रूटच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात याव्या नाही तर प्रवाशांना उग्र आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही.



