बीड

माजलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! ॲड. रवींद्र कानडे यांना ‘बेस्ट प्रेसिडेंट’चा गोल्डन अवॉर्ड

माजलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! ॲड. रवींद्र कानडे यांना ‘बेस्ट प्रेसिडेंट’चा गोल्डन अवॉर्ड

सुहास सावंत / माजलगाव:-माजलगावच्या रोटरी क्लब ऑफ माजलगाव सिटीचे अध्यक्ष ॲड. रवींद्र कानडे यांचा जालना येथे ‘बेस्ट प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब’ या गोल्डन अवॉर्डने सन्मान करण्यात आला आहे. रोटरीच्या विभागीय स्तरावर १८ जिल्ह्यांतून आलेल्या १०५ क्लब्सपैकी त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. माजलगावकरांसाठी हा एक मोठा गौरव आहे.

ॲड. कानडे यांनी २०२४-२५ या वर्षात रोटरीच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवले. यामध्ये आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी, रक्तदान शिबिरे, आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रमांचा समावेश आहे. विशेषतः, विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली ‘टॅलेंट सर्च’ परीक्षा आणि गरजू विद्यार्थ्यांना सायकल, स्पोर्ट्स शूज, संगणक व टीव्ही वाटप असे उपक्रम कौतुकास्पद ठरले. त्यांच्या याच कार्याची दखल घेत विभागीय स्तरावर त्यांना सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराबद्दल बोलताना ॲड. कानडे यांनी त्यांच्या यशाचे श्रेय क्लबच्या सचिव सौ. लता जोशी आणि सर्व सदस्यांना दिले. हा पुरस्कार सामाजिक कार्यासाठी अधिक प्रेरणा देणारा असल्याचे सांगत, भविष्यातही आपण अशा सेवाकार्यात नेहमीच अग्रेसर राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या गौरव सोहळ्याला रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री. सुरेश साबू, विद्यमान प्रांतपाल सुधीर लातुरे, भावी प्रांतपाल जयेश पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Back to top button