अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीत २०६ कोटींची पाणीपुरवठा योजना ठरणार निर्णायक मुद्दा!

अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीत २०६ कोटींची पाणीपुरवठा योजना ठरणार निर्णायक मुद्दा!
*अंबाजोगाई प्रतिनिधी, बालाजी देशमुख* : नगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंदडा कुटुंबाने केलेल्या विकास कामांमुळे आणि त्यांच्या व्हिजनमुळे प्रभावित होऊन अनेक स्थानिक नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या विकासकामांमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा ठरणार आहे तो म्हणजे २०६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना! शहराच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय करणारी २०६ कोटी ७३ लाखांची नळयोजना आता प्रत्यक्ष स्वरूप घेत असून त्यामुळे निवडणूक लढतीत नंदकिशोर मुंदडा यांचे पारडे जड होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
अंबाजोगाईचा पाणीपुरवठा धनेगाव येथील मांजरा प्रकल्पावर अवलंबून आहे. परंतु धरण क्षेत्रातील अंबाजोगाईचे पंपहाऊस पाळूपासून दूर असल्याने धरणाची पाणीपातळी कमी होताच अंबाजोगाईचा पाणी पुरवठा बंद होतो. त्यामुळे शहराला पावसाळ्यातही आठवड्यातून एकदा आणि उन्हाळ्यात तर महिन्यातून केवळ एक ते दोन वेळेसच पाणी पुरवठा होतो. ही परिस्थिती अंबाजोगाईकरांनी वर्षानुवर्षे सहन केली. या भीषण वास्तवाचा गांभीर्याने विचार करून आ. नमिता मुंदडा यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत अंबाजोगाईसाठी नवीन पाणीपुरवठा प्रकल्प मंजूर करून आणला. राज्य शासनाने नगरोत्थान महाअभियानांतर्गत तब्बल २०६ कोटी ७३ लाखांचा निधी मंजूर केला आणि नगर परिषदेमार्फत या कामाला गती देण्यात आली.
या योजनेअंतर्गत मांजरा प्रकल्पातील मुख्य पाळूजवळ आधुनिक पंपहाऊस उभारले जात आहे. मांजरा प्रकल्पासून जवळपास 35 किलोमीटर अंतराची अत्याधुनिक पाईपलाईन थेट अंबाजोगाईपर्यंत आणली जात आहे. शहरातील सात ठिकाणी उच्च क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या जात आहेत. तसेच जुन्या पाईपलाईनला समांतर नवीन पाईपलाईन टाकून दररोज सुरळीत पाणीपुरवठा करण्याची तयारी सुरू आहे. कामे जलद गतीने पूर्णत्वाकडे वाटचाल करत असून पुढील दिवाळीपर्यंत नागरिकांना दररोज पाणी मिळणार हे निश्चित आहे.
या प्रकल्पामुळे अंबाजोगाईतील पाणीटंचाईचा ऐतिहासिक प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. शहराच्या दैनंदिन जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या या योजनेमागे नंदकिशोर मुंदडा यांची विकासदृष्टी आणि मुंदडा कुटुंबाचे सततचे प्रयत्न निर्णायक ठरल्याचे नागरिक खुलेपणाने व्यक्त करू लागले आहेत. अंबाजोगाईला दररोज पाणी मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणारा नेता म्हणून नागरिकांचा कल नंदकिशोर मुंदडा यांच्याकडे झुकताना दिसत आहे. नगराध्यक्षपदाच्या लढतीत ही २०६ कोटींची नळयोजना नंदकिशोर मुंदडा यांच्यासाठी खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरणार असल्याचे दिसून येत आहे.



