गोरगरिबांच्या ताटातील घास पळवला ; जामखेड तालुक्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार

गोरगरिबांच्या ताटातील घास पळवला ; जामखेड तालुक्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार
प्रशासन अनभिज्ञ की हातमिळवणी?
जामखेड प्रतिनिधी :जामखेड तालुक्यात गरीबांसाठी असलेले शासकीय स्वस्त धान्य खुलेआम काळाबाजारात विकले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे धान्य थेट शहरातील काही निवडक व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवले जात असल्याचा आरोप होत असून, तहसीलदार व तालुका पुरवठा अधिकारी मात्र याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.
मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी तहसीलदार पथकाने काळाबाजारात जाणारे धान्य जप्त केले होते. मात्र, त्या कारवाईनंतरही काळाबाजार थांबण्याऐवजी दिवसेंदिवस फोफावतच आहे. पुरवठा विभागात पुरेसे अधिकारी नसल्याने खाजगी कर्मचाऱ्यांचे वर्चस्व वाढले असून, खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांनी आपलीच पोळी भाजून घेण्याचा उद्योग सुरू केला आहे.
‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या तत्वावर ही साखळी चालवली जात असल्याचे बोलले जात असून, जिल्हा पुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांनाही हाताशी धरल्याचा आरोप होत आहे. यामुळे गरीब लाभार्थ्यांचे धान्य थेट काळाबाजारात माफियांच्या पोटात जात आहे.
यावर्षी ‘ई-पॉस’ मशिनची अंमलबजावणी झाली असतानाही हा घोटाळा सुरुच आहे, यावरून प्रशासन किती गंभीर आहे हे दिसते. काही राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारीही या धान्य काळाबाजारात गुंतल्याचे आरोप होत असून, अधिकारी मात्र यावर उघडपणे बोलण्यास तयार नाहीत.
शासकीय पोती बदलून तांदूळ व गहू काळाबाजारात विकले जात असल्याचे प्रकार घडत असून, गरीब लाभार्थ्यांना याचा फटका बसत आहे. अनेक गरीब कुटुंबे पुरवठा दुकानदार व दलाल यांच्या जाळ्यात अडकून धान्य व्यापाऱ्यांना विकून मोकळी होतात आणि माफिया त्याचा फायदा उचलतात.
यामुळे शासकीय स्वस्त धान्याचा उद्देशच फोल ठरतो आहे. लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या या रॅकेटवर कठोर कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
तालुका व जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा सामान्य लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचणार नाहीत आणि गोरगरिबांच्या ताटातील घास माफियांकडे जाण्याचे सत्र असेच सुरू राहील.



