बाळगव्हाण येथे बाप- लेकाचा विजेच्या शाॅकने दुर्दैवी मृत्यू आमदार रोहित पवारांचे महावितरणवर ताशेरे, कुटुंबाला मदतीची मागणी

बाळगव्हाण येथे बाप- लेकाचा विजेच्या शाॅकने दुर्दैवी मृत्यू
आमदार रोहित पवारांचे महावितरणवर ताशेरे, कुटुंबाला मदतीची मागणी
जामखेड प्रतिनिधी –वादळात तुटलेल्या आणि ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरही न दुरुस्त केलेल्या विजेच्या तारांचा जीवघेणा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शिकारे वस्ती बाळगव्हाण (ता. जामखेड) येथील ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब शिकारे (वय ४२) आणि त्यांचा मुलगा महेश (वय १५) यांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या वादळात या परिसरातील विजेचे तारे तुटून पडले होते. ग्रामस्थांनी महावितरणकडे वारंवार तक्रार करूनही दुरुस्ती झाली नव्हती. अखेर या निष्काळजीपणाचा फटका शिकारे कुटुंबाला बसला.
काकासाहेब शिकारे आपल्या शेतात खत टाकण्यासाठी गेले असता शेतात पडलेल्या तारांना स्पर्श झाल्याने त्यांनी आणि त्यांच्या मुलाने प्राण गमावला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल आमदार रोहित पवार यांनी घेतली असून त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून पोस्ट करत या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दोषी महावितरण अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि सरकारने पीडित शिकारे कुटुंबाला तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
*चौकट*
या अपघातानंतर महावितरणच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



