जामखेड–कर्जत रोडवर विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात ८ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

जामखेड–कर्जत रोडवर विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात
८ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
जामखेड प्रतिनिधी : रविवारची सहल आनंदाची ठरण्याऐवजी अपघातात बदलली असून अकलुज येथे वॉटरपार्कला जात असलेल्या विद्यार्थींच्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला.
शहरापासून तीन कि.मी अंतरावरील जामखेड–कर्जत रोडवरील रत्नदीप मेडिकल कॉलेजजवळ वाहनाने अचानक दोन ते तीन पलटी मारल्या. या अपघातात चालकासह एकूण आठ जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे.
जखमींची नावे श्रेयश प्रल्हाद राजगुरू, चैतन्य भक्तराज राजगुरू, ओम महेंद्र राऊत, सौरभ बबन येवले, साहिल अंबिका जाधव, यश संतोष खेत्रे, अमिन शेख (सर्व रा. जामखेड) तसेच वाहन चालक अशी आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामखेड शहरातील नववी व दहावीचे विद्यार्थी रविवार दि. २९ मार्च रोजी सकाळी ७ वाजता अकलुज येथील वॉटरपार्क येथे फिरण्यासाठी एमएच-१६ बीव्ही ०१०४ या चारचाकी वाहनाने निघाले होते. दरम्यान, जामखेड शहरापासून सुमारे तीन कि.मी अंतरावरील जामखेड–कर्जत रोडवरील रत्नदीप मेडिकल कॉलेजजवळील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहनाने अचानक दोन ते तीन पलटी मारल्या.
अपघातादरम्यान वाहनाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबावर जोरदार धडक दिली. त्यानंतर बाजूच्या तारेचे कंपाउंड तोडून वाहन आतमध्ये शिरले. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले व त्यांच्या मदतीने जखमींना वाहनाबाहेर काढण्यात आले.
या अपघातात श्रेयश प्रल्हाद राजगुरू व वाहन चालक हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



