बीड

विद्यार्थ्यांनी समाज आणि राष्ट्रासाठी आपले ज्ञान उपयोगात आणावे – प्राचार्य प्रा. डी.जी.निकाळजे

विद्यार्थ्यांनी समाज आणि राष्ट्रासाठी आपले ज्ञान उपयोगात आणावे – प्राचार्य प्रा. डी.जी.निकाळजे
 बीड (दि.२४) – ज्यांनी या देशाला संविधानासारखा अमूल्य वारसा दिला, त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विद्यापीठात शिक्षण घेणे, ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. मात्र हा अभिमान केवळ नावापुरता न राहता, तो विद्यार्थ्यांच्या आचरणातून आणि कार्यातून दिसला पाहिजे. समता-न्यायाचा मार्ग स्वीकारून समाज व राष्ट्रासाठी कार्य केले, तरच या अभिमानाचं खरं सार्थक होईल, असे प्रतिपादन प्राचार्य प्रा.डी.जी.निकाळजे यांनी केले.
ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार (दि.२३) रोजी तुलसी संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी प्राचार्य डॉ.व्हि.एस.बांदल, प्राचार्य प्रा.डी.डी. राऊत, प्रशासकीय अधिकारी अनिता पाटील, डॉ. विकास वाघमारे, प्रा.विवेक जोगदंड आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना विद्यापीठाला गुणवत्ता द्यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला न्याय, समता आणि बंधुता यांचा मूलमंत्र प्रत्येक विद्यार्थ्याच्या आचरणात उतरला पाहिजे. गरीब–श्रीमंत असा कोणताही भेद न करता समान शिक्षणाची संधी सर्वांना मिळाली पाहिजे. हीच खरी बाबासाहेबांना वाहिलेली खरी आदरांजली आहे
डॉ. बांदल यांनी विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचा इतिहास उलगडताना सांगितले की, १९७६ ते १९९४ या कालावधीत तब्बल १७ वर्षे संघर्ष चालला. अखेर १४ जानेवारी १९९४ रोजी विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव प्राप्त झाले. या चळवळीत गौतम वाघमारे, पोचीराम कांबळे यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
डॉ.वाघमारे यांनी, बाबासाहेबांच्या दूरदृष्टीतून मराठवाड्यात विद्यापीठ व पीपल्स एज्युकेशन सोसायटीतून समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत शिक्षण पोहोचल्याचे यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.किशोर वाघमारे यांनी, तर आभार प्रा.योगिता लांडगे यांनी मानले. या वेळी महाविद्यालयातील शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button