बीड

श्रीवर्धनमध्ये महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत; पालकांकडून कौतुक

श्रीवर्धनमध्ये महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत; पालकांकडून कौतुक
​श्रीवर्धन (प्रतिनिधी, संदेश घोलप):
विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या सामाजिक बांधिलकीतून महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट, श्रीवर्धन शाखेच्या वतीने बोर्लीपंचतन विभागातील विविध गावांमध्ये वह्यांचे वाटप करण्यात आले. शुक्रवार, १२ जून रोजी हा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
​वावेपंचतन, नागलोळी-नवीवाडी, खुजारे, वेळास आणि वांजळे या गावांमधील समाज बांधवांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य सुपूर्द करण्यात आले. ट्रस्टच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या सेवाभावी उपक्रमा प्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त प्रकाश रिकामे, माजी विश्वस्त सुरेश तांबडे, कार्याध्यक्ष मोहन लाड, सचिव लिलाधर रिकामे, खजिनदार दिलीप खेडेकर आणि ज्येष्ठ सल्लागार नथूराम महाडिक प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच तरुण सदस्य उदय रिकामे, संतोष मिरगळ, मिलन काते, आत्माराम महाडिक, माजी कार्याध्यक्ष शरद खेडेकर, महिला सदस्या नेहा महाडिक, अरुण वाजे आणि दर्गे यांच्यासह अनेक समाज बांधवांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “शिक्षणाशिवाय प्रगती नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून सातत्याने अभ्यास करावा,” असे आवाहन यावेळी करण्यात आले. समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी ट्रस्ट नेहमीच तत्पर राहील, अशी ग्वाही देखील यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली.

Back to top button