बीड

दिव्यांग अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करा; अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन!

दिव्यांग अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करा; अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन!

*आरपीआय दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश माने यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन*

*दोषी ग्रामसेवकाला पाठीशी घालणाऱ्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी*
प्रतिनिधी | बीड
बीड जिल्हा परिषदेमध्ये एक अत्यंत संतापजनक आणि गंभीर प्रकार समोर आला असून, एका दिव्यांग कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याला थेट धमकी देणाऱ्या मुजोर ग्रामसेवकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) दिव्यांग आघाडी’चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश धर्मराज माने यांनी आज, १५ जून रोजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांना थेट निवेदन देऊन दोषींवर कडक कारवाई न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा आक्रमक इशारा दिला आहे.
बीड जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी (अतिरिक्त कार्यभार: पंचायत विभाग) राजेंद्र श्रीरंग ओव्हाळ हे दिव्यांग अधिकारी आहेत. गत २६ मे २०२६ रोजी, ग्रामपंचायत धोत्रा (ता. केज) येथील ग्रामसेवक सखाराम विठ्ठल काशिद याने प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करून ओव्हाळ यांच्यावर फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणला. ओव्हाळ यांनी नियमानुसार स्वाक्षरी न केल्याने संतापलेल्या काशिद याने, “तुला बघून घेतो, तू सह्या केल्या कशा नाही?” अशा अत्यंत हीन आणि धमकीवजा भाषेचा वापर केला. ओव्हाळ हे दिव्यांग असल्याचा गैरफायदा घेत त्यांचा मानसिक छळ करण्यात आला आणि शासकीय कामात गंभीर अडथळा निर्माण केला गेला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दोषींची पाठराखण?
या धक्कादायक आणि अन्यायकारक घटनेची माहिती तात्काळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) किशोर काळे यांना देण्यात आली होती. मात्र, एका दिव्यांग अधिकाऱ्याला न्याय देण्याऐवजी काळे यांनी चक्क दोषी ग्रामसेवक सखाराम काशिद याची उघडपणे पाठराखण (वकिली) केल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या या भूमिकेमुळे जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आर.पी.आय. दिव्यांग आघाडीच्या प्रमुख मागण्या
तात्काळ निलंबन: दिव्यांग अधिकाऱ्यावर दबाव आणून धमकी देणाऱ्या मुजोर ग्रामसेवक सखाराम विठ्ठल काशिद याला शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित करावे.
गुन्हा दाखल करा: ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६’ (RPWD Act) आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोषी ग्रामसेवकावर तात्काळ कडक कायदेशीर गुन्हे दाखल व्हावेत.
उच्चस्तरीय चौकशी: दोषी कर्मचाऱ्याची उघड पाठराखण करणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) किशोर काळे यांच्या संशयास्पद भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
—-
तर महाराष्ट्र पेटून उठेल!- सुरेश माने
प्रशासकीय व्यवस्थेत काम करणाऱ्या दिव्यांग अधिकाऱ्याचा अशा प्रकारे मानसिक छळ आणि अपमान केला जात असेल, तर ते सहन केले जाणार नाही,” असा संतप्त इशारा आरपीआय दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश धर्मराज माने यांनी दिला आहे. जर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर तात्काळ कडक कारवाई केली नाही, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) दिव्यांग आघाडी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.

Back to top button