साळवे प्रकरणात नवे वळण : जामखेड पोलीस ठाण्यात वैभव साबळेंची फिर्याद दाखल

साळवे प्रकरणात नवे वळण : जामखेड पोलीस ठाण्यात वैभव साबळेंची फिर्याद दाखल
जामखेड प्रतिनिधी – तहसीलमधील नान्नज येथे २४ ऑगस्ट रोजी साळवे कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक झालेल्या आरोपींपैकी वैभव विजय साबळे (वय २९, रा. नान्नज) याने ३१ ऑगस्ट रोजी जामखेड पोलीस ठाण्यात नवी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत त्यानेही २४ ऑगस्टच्या रात्री साळवे कुटुंबीयांकडून स्वतःवर जिवघेणा हल्ला झाल्याचा आरोप केला आहे.
*डायल-११२ वरून दिली माहिती*
वैभव साबळेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रात्री घरात आल्यानंतर त्याच्या वडिलांनी सांगितले की, सुनील साळवे, अभिजीत साळवे, रतन साळवे हे बंदूक व इतर शस्त्रास्त्रांसह घरात आले व गोंधळ घालत मारहाण करून पसार झाले. यानंतर त्याने वडिलांच्या मोबाईलवरून डायल-११२ वर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. या प्रकरणात पोलिसांनी यशदीप साळवे, अभिजीत भालेराव, आदर्श साळवे, शिवानी साळवे, सुनील साळवे, अभिजीत साळवे, रतन साळवे, सतिश साळवे, सद्दाम पठाण, अरविंद भालेराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
*विवाद सोडवण्याचा प्रयत्न करताना मारहाण*
फिर्यादीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास वैभव साबळे आपल्या मित्र अभयराजे भोसले याच्यासोबत पान टपरीवर बसला होता. त्याचवेळी दिग्विजय आबू सोनवणे हा तेथे आला व अभयराजेशी वाद घालू लागला. हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर दिग्विजयने यशदीप संपत सालवे याला फोन करून बोलावले. यशदीप सोबत अभिजीत साळवे, सतीश साळवे, अरविंद भालेराव, सद्दाम पठाण, आदर्श साळवे हे कोयता, लोखंडी रॉड, बांबू घेऊन आले आणि अभयराजेवर हल्ला केला.
यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना अभिजीत साळवे, आदर्श साळवे व अरविंद भालेराव यांनी वैभव साबळेवर कोयत्याने वार केला. दरम्यान, सद्दाम पठाणने त्याच्या खिशातून दोन हजार रुपये काढले तर सतीश साळवेने गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेली. त्याचवेळी साळवे कुटुंबीयांच्या महिलांनी पान टपरीवर दगडफेक केली. नंतर साबळे व अभय घटनास्थळावरून निघून गेले.
काही वेळाने पुन्हा टपरीवर परतल्यावर फ्रीज, मोबाईलसह इतर साहित्य तोडलेले दिसले. तसेच काउंटरवरील सुमारे चार हजार रुपयेही गायब असल्याचे साबळेंनी फिर्यादीत नमूद केले आहे.



