📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पैठण तालुका गुटखा माफियांच्या विळख्यात?; बंदी कागदावर, अवैध व्यापार मात्र राजरोस

पैठण तालुका गुटखा माफियांच्या विळख्यात?; बंदी कागदावर, अवैध व्यापार मात्र राजरोस
पोलीस व अन्न प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; गावोगावी होलसेल गुटखा विक्रीचे जाळे
पैठण | किरण काळे
महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी लागू होऊन अनेक वर्षे लोटली, कायदे अधिक कठोर झाले, अजामीनपात्र गुन्ह्यांची तरतूद करण्यात आली; मात्र पैठण तालुक्यातील वास्तव याच्या अगदी उलट असल्याचे दिसून येत आहे. शहरापासून खेड्यापाड्यांपर्यंत गुटख्याची खुलेआम विक्री होत असून अवैध व्यापार करणाऱ्यांनी या धंद्याचे अक्षरशः साम्राज्य उभे केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे “पैठण तालुका म्हणजे गुटख्याचे माहेरघर बनले आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
राज्य शासनाने आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या गुटख्यावर बंदी घातली असली तरी पैठण तालुक्यात ती केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे. गुटखा विक्रीच्या साखळीत किरकोळ विक्रेत्यांपासून ते मोठ्या होलसेलरपर्यंत अनेकांची साखळी कार्यरत असून दिवस-रात्र लाखोंची उलाढाल सुरू असल्याचा आरोप होत आहे.
महाराष्ट्रात गुटखा उत्पादन व विक्रीवर बंदी असली तरी गोवा, कर्नाटक आणि इतर काही राज्यांमध्ये गुटखा निर्मिती सुरू आहे. तेथून ट्रक आणि इतर वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणावर गुटखा महाराष्ट्रात आणला जातो. जिल्ह्यातील काही केंद्रांमार्फत त्याचे वितरण होत असून पैठण तालुका हा या अवैध पुरवठा साखळीचा प्रमुख दुवा बनल्याची चर्चा आहे.
तालुक्यातील बिडकीन, पाचोड, ढोरकीन, लोहगाव, चितेगाव, विहामांडवा, पिंपळवाडी पिराची, दावरवाडी, आडूळसह अनेक भागांत होलसेल गुटखा विक्रीचे जाळे पसरल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या ठिकाणांहून छोट्या टपऱ्या, पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि जनरल स्टोअर्सना नियमित पुरवठा होत असल्याचे बोलले जात आहे.
गुटखा व्यवसायाशी संबंधित एका होलसेल विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर धक्कादायक दावा केला. त्याच्या म्हणण्यानुसार, या व्यवसायात उतरण्यापूर्वी काही संबंधित यंत्रणांपर्यंत माहिती पोहोचवावी लागते. कारवाई झालीच तर ती पुढे कशी हाताळायची याचीही चिंता नसते, असा दावा संबंधिताने केला. या दाव्यांची अधिकृत पुष्टी नसली तरी अशा चर्चांमुळे संबंधित विभागांच्या भूमिकेबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बिडकीन परिसरातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा पुरवठा होत असून काही गोदामांमधून माल साठवून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचवला जातो. पाचोड आणि ढोरकीन परिसरातही अशाच प्रकारचे वितरण जाळे सक्रिय असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे दुचाकींवर बॉक्स टाकून भरदिवसा गुटख्याचा माल पोहोचवला जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे वास्तव आहे. छोट्या पानटपऱ्यांपासून मोठ्या दुकानांपर्यंत विविध ब्रँडचे गुटखे खुलेआम विकले जात असल्याचे दिसून येते. अल्पवयीन मुलांपर्यंतही हा घातक पदार्थ सहज पोहोचत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
राज्य सरकारने गुटखा विक्री, वाहतूक आणि साठेबाजीविरोधात कठोर पावले उचलली आहेत. गुटखा प्रकरणांमध्ये अजामीनपात्र गुन्ह्यांची तरतूद करण्यात आली असून अन्न व औषध प्रशासनालाही विशेष अधिकार देण्यात आले आहेत. तरीही पैठण तालुक्यात गुटखा विक्री रोखण्यात प्रशासनाला यश का येत नाही, हा मोठा प्रश्न आहे.
किरकोळ विक्रेत्यांवर अधूनमधून कारवाई होत असली तरी या अवैध व्यापारामागील मोठे साठेबाज, पुरवठादार आणि आर्थिक साखळी अद्यापही अबाधित असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, मोठ्या साठेबाजांवर कठोर कारवाई व्हावी आणि या अवैध व्यापाराला संरक्षण देणाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
पैठण तालुक्यात गुटखा विक्रीचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत असताना संबंधित यंत्रणा खरोखरच अनभिज्ञ आहेत की सर्व काही माहित असूनही डोळेझाक केली जात आहे, हा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. गुटखा माफियांचे मनोबल एवढे वाढण्यामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे? याचे उत्तर शोधण्याची वेळ आता प्रशासनावर आली आहे.
Back to top button