तणावमुक्त जीवनासाठी योग – धोत्रीतील पी.एम.श्री.शाळा येथील विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र

तणावमुक्त जीवनासाठी योग – धोत्रीतील पी.एम.श्री.शाळा येथील विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र
प्राचार्य बाळासाहेब पारखे यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न
जामखेड प्रतिनिधी – दि.१९आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी योगाभ्यास हा महत्त्वाचा उपाय आहे. याच संदर्भात ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य व योगशिक्षक बाळासाहेब पारखे यांनी दि. 18 मार्च 2025 रोजी जामखेड तालुक्यातील धोत्री येथे योगा अभ्यासाच्या महत्त्वावर सखोल मार्गदर्शन केले.
आपल्या व्याख्यानात पारखे सरांनी योगासनांचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम यावर भर दिला. “योगासनाच्या नियमित सरावाने शुगर, बीपी यांसारखे आजार नियंत्रित करता येतात. जर गोळीशिवाय आरोग्यपूर्ण जीवन जगायचे असेल, तर योगाशिवाय पर्याय नाही,” असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच, मुलांच्या आहार-विहाराची विशेष काळजी घेण्याचे महत्त्व, जंक फूडपासून मुलांना अलिप्त ठेवण्याची गरज यावरही त्यांनी पालकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम अडाले यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, केंद्रप्रमुख नवनाथ बडे, नगरसेवक दिगंबर चव्हाण, प्रसिद्ध साहित्यिक गोकुळ गायकवाड, लेखक एकनाथ चव्हाण, तसेच मडके सर उपस्थित होते.
प्रसिद्ध साहित्यिक गोकुळ गायकवाड सरांनी आपल्या ‘धम्मपदा बोलती दोहे आणि गाथा’, ‘माझा गाव, माझी माणसं’, ‘ताटातूट’, ‘वेदना’ या पुस्तकांचा परिचय करून दिला. नवोदित साहित्यिक एकनाथ चव्हाण सरांनी ‘पंच भाऊ’ या कथासंग्रहाचा उल्लेख करून शाळेस पाच पुस्तके भेट दिली.
नगरसेवक दिगंबर चव्हाण यांनीही आपल्या भाषणात योगाचे महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ सदस्य अविनाश कदम, शिक्षणप्रेमी नागरिक हरिश्चंद्र कदम, शंकर खैरे, शिवाजी काळभोर, काकासाहेब अडाले, ईश्वर खैरे, प्रकाश अडाले यांसह गावातील अनेक माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका चंद्रकला खरपुडे मॅडम यांनी केले, तर सूत्रसंचालन अभिमान घोडेस्वार सरांनी केले.



