संपादकीय

शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर शरद पवारांचं भाष्य

 

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मतानं पराभव झाला. त्यांच्या या पराभवावरुन राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. तसेच शिंदे कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादी कार्यालयावर हल्ला चढवला होता. आता शिंदे यांच्या या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. शशिकांत शिंदे यांनी ही निवडणूक गांभीर्यानं घ्यायला हवी होती, असं पवार यांनी म्हटलं आहे.

सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले, “सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. मात्र, मी अद्याप त्यांच्या पराभवाचं कारण काय असू शकेल याच्या खोलात गेलेलो नाही. पण त्यांनी ही निवडणूक गांभीर्यानं घ्यायला हवी होती.” शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते, बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्याकडून अवघ्या एका मतानं त्यांना पराभव पत्करावा लागला.

दरम्यान, पुढच्या तीन-चार महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ शकतात, असे संकेतही पवार यांनी यावेळी दिले. या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरच दगडफेक केली होती. या कृत्याद्वारे त्यांनी थेट पक्षालाच आव्हान दिलं होतं. मात्र, कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात ही चूक घडल्याचं शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं.

Back to top button