📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहम्मदभाई मेमन यांनी वाढदिवसानिमित्त पूर्ण केले ‘पाणी’ वचन; शेखाडी ग्रामस्थांकडून कृतज्ञता व्यक्त

श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहम्मदभाई मेमन यांनी वाढदिवसानिमित्त पूर्ण केले ‘पाणी’ वचन; शेखाडी ग्रामस्थांकडून कृतज्ञता व्यक्त
​श्रीवर्धन (संदेश घोलप ):निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांना आश्वासनांची खैरात वाटणे ही राजकीय प्रथा असली, तरी दिलेला शब्द प्राणापलीकडे जपणारे नेतृत्व विरळाच असते. श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ व प्रमुख नेते मा. श्री. मोहम्मदभाई मेमन  यांनी राजकारणापलीकडे जात माणुसकीचे दर्शन घडविले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारावेळी शेखाडी गावाला दिलेल्या शब्दाखातर, मे महिना उजाडण्यापूर्वीच त्यांनी मेमन परिवाराच्या वतीने स्वखर्चाने बोअरवेल खोदून दिली आहे. विशेष म्हणजे, आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी हा पाणी प्रश्न कायमचा निकाली काढल्याने संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
​दिलेला शब्द पाळला!
​नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मा. श्री. मोहम्मदभाई मेमन , इतर पदाधिकारी आणि उमेदवार प्रचारासाठी मौजे शेखाडी गावात गेले होते. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या हक्काच्या पिण्याच्या पाण्यासाठी नेत्यांकडे गाऱ्हाणे मांडले होते. “उन्हाळा सुरू झाला की आमची पाण्यासाठी वणवण होते, आम्हाला कायमस्वरूपी मार्ग काढून द्या,” अशी विनंती ग्रामस्थांनी केली होती. त्यावेळी मेमन यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले होते की, “सरकारी प्रक्रियेची वाट न पाहता, माझ्या मेमन परिवाराकडून मी तुम्हाला मे महिना सुरू होण्यापूर्वी बोअरवेल मारून देईन.”
​वाढदिवशी दिला शब्दाचा ‘जलाभिषेक’
​दिलेला शब्द विसरणे ही आजच्या राजकारणातील सामान्य बाब झाली असताना, मोहम्मदभाई मेमन यांनी मात्र आपला शब्द प्रमाण मानला. त्यांनी वाढदिवसाच्या सोहळ्यावर किंवा जाहिरातींवर खर्च करण्यापेक्षा, तो पैसा जनसेवेसाठी वापरण्याचा आदर्श निर्णय घेतला. मे महिना सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच त्यांनी शेखाडी गावात बोअरवेलचे काम यशस्वीपणे पूर्ण केले. आज या बोअरवेलला मुबलक पाणी लागल्याने शेखाडी गावातील माता-भगिनींच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले आहे.
​सध्या अनेक नेते विकासकामांसाठी केवळ सरकारी निधीवर अवलंबून असतात. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याने स्वतःच्या खिशातून हा निधी खर्च करून एक नवा वस्तूपाठ घालून दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून कार्यरत असतानाही, त्यांनी दाखवलेले हे दातृत्व त्यांच्या जनसेवेची प्रचिती देते.
​ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने शेखाडी ग्रामस्थ भारावून गेले आहेत. “आमच्या गावात अनेक नेते आले आणि गेले, पण मोहम्मदभाईंनी जो शब्द दिला तो प्रत्यक्षात उतरवला. मेमन परिवाराने केलेल्या या मदतीमुळे आमचे मोठे संकट टळले आहे,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी मा. श्री. मोहम्मदभाई मेमन व त्यांच्या संपूर्ण परिवाराचे जाहीर आभार मानले आहेत.

Back to top button