📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

भगवान महाविद्यालयाच्या सुजित उबाळेला एम. ए. इंग्रजीत सुवर्णपदक

भगवान महाविद्यालयाच्या सुजित उबाळेला एम. ए. इंग्रजीत सुवर्णपदक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ७७.६ टक्के गुण

जामखेड प्रतिनिधी:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने एप्रिल/मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या भगवान महाविद्यालयाचा विद्यार्थी सुजित अशोक उबाळे याने एम. ए. इंग्रजी या विषयात विद्यापीठात सर्वाधिक ७७.६ टक्के गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले.
विद्यापीठाच्या ३२ व्या नामविस्तार दिनानिमित्त बुधवार, दि. १४ जानेवारी २०२६ रोजी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी विविध विषयांतील सुवर्णपदक विजेत्यांची नावे जाहीर केली.
भगवान महाविद्यालयाचा सुजित उबाळे याने एम. ए. इंग्रजी विषयासाठीचे प्रा. एस. टी. प्रधान सुवर्णपदक कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते स्विकारले. विद्यापीठाच्या नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ कवी प्रा. फ. मु. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरोदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. भारत खंदारे, डॉ. अपर्णा पाटील तसेच विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे उपस्थित होते.ग्रामीण भागातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने मिळवलेले हे यश महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे गौरवोद्गार प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांनी काढले. सुजित उबाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष भिमराव धोंडे, सहसचिव व विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. अजय धोंडे, प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ, उपप्राचार्य आप्पासाहेब टाळके, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. शिवाजी पवार, प्रा. निरंजन हेळकर तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Back to top button