विद्यार्थ्यांनी सेवा वृत्तीला प्राधान्य द्यावे – ह.भ.प रामकृष्ण रंधवे बापू

वसंतदादा पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उद्घाटन संपन्न
पाटोदा /वार्ताहर : विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे सोबतच विद्यार्थ्यांनी सेवावृत्ती अंगीकारणे आवश्यक आहे या सेवावृत्ती मधूनच विद्यार्थ्यांचे जीवन महान होईल. आपण राष्ट्राचे देणे लागतो, विद्यार्थ्यांनी जागृत होऊन देशाच्या हितासाठी आपले कार्य करणे अगत्याचे आहे असे प्रतिपादन ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापू यांनी केले. वसंतदादा पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मौजे चुंबळी येथे ते बोलत होते.
चुंबळी येथे वसंतदादा पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे उद्घाटन दि 13 जानेवारी रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ.बळीराम राख हे होते तर उद्घाटक म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापू, प्रमुख अतिथी म्हणून सरपंच डॉ.रेश्मा पवळ, उप-प्राचार्य डॉ.सतीश माऊलगे, उप -प्राचार्य डॉ.अभय क्षीरसागर, पदव्युत्तर संचालक डॉ.गणेश पाचकोर, उप-प्राचार्य प्रा.नामदेव चांगन, कार्यक्रम अधिकारी डॉ.सोमनाथ लांडगे यांची उपस्थिती होती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली ‘युवा व शास्वत विकास विशेष पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकास’ या मुख्य विषयावर सदरील शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुरुवातीस राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. बळीराम राख म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना हा एक उपक्रम नसून ती विद्यार्थांसाठी एक संधी आहे. विद्यार्थ्यांनी या शिबीर दरम्यान विविध कामे करून एक आदर्श निर्माण करावा असे डॉ. राख यांनी सांगितले. सरपंच डॉ.रेश्मा पवळ या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आपल्या समाजाच्या, गावाच्या, देशाच्या विकासासाठी पुढे येणे आवश्यक आहे. आजचा तरुणांनी गावच्या विकास प्रक्रियेत पुढे येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.सोमनाथ लांडगे यांनी केले, सूत्र संचालन डॉ.पांडुरंग सुतार यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.मनीषा गाडवे यांनी केले. या शिबिरासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व ग्रामस्थ उपस्थित होते. सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. जालिंदर लोणके, डॉ. प्रदीप मांजरे,डॉ.चंद्रशेखर बनसोडे, प्रा.विनोद उगले,प्रा. कंटाळे, युवराज कोकाटे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले



