बीड

रोहितळमध्ये पुन्हा अवैध दारू विक्री पकडली; ग्रामस्थांमध्ये संताप, कारवाईची मागणी

रोहितळमध्ये पुन्हा अवैध दारू विक्री पकडली; ग्रामस्थांमध्ये संताप, कारवाईची मागणी
तलवाडा | प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील रोहितळ येथे अवैध दारू विक्रीचा प्रकार पुन्हा उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी तलवाडा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसमोर अवैध दारूच्या बाटल्या नष्ट करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत माहिती समोर आलेली नसल्याने ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, दि. 17 जून रोजी गावकऱ्यांनी पुन्हा अवैध दारू विक्री सुरू असल्याचे पकडून दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईच्या प्रभावीतेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अवैध दारू विक्री करणारी व्यक्ती गावकऱ्यांशी आरेरावीची भाषा वापरत असून त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवैध दारू विक्रीमुळे युवकांचे नुकसान होत असून गावातील सामाजिक वातावरणही बिघडत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करून रोहितळ गावातील अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने तलवाडा पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन देत अवैध दारू विक्रेत्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करावी, असे आवाहनही गावातील नागरिकांकडून करण्यात आले आहे. पोलीस प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे आता रोहितळ ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Back to top button