बीड
आष्टीत २८ जून रोजी दुग्ध उत्पादक शेतकरी मेळावा; फायदेशीर दुग्ध व्यवसायावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

आष्टीत २८ जून रोजी दुग्ध उत्पादक शेतकरी मेळावा; फायदेशीर दुग्ध व्यवसायावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी तालुका सहकारी दूध संघ मर्यादित, आष्टी आणि प्रोग्रेसिव्ह ब्रीडर फार्मर्स असोसिएशन (PBFA) यांच्या संयुक्त विद्यमाने “फायदेशीर दूध व्यवसाय” या विषयावर दुग्ध उत्पादक मार्गदर्शक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अनिषा ग्लोबल स्कूल, जामगाव रोड, आष्टी येथे होणार आहे.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आ. सुरेश (अण्णा) धस हे राहणार असून, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दुग्ध व्यवसाय तज्ज्ञ डॉ. शैलेश रामदने हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेतकऱ्यांना आधुनिक दुग्ध व्यवसाय, पशुपोषण, उत्पादनवाढ, खर्च कमी करण्याचे उपाय, तांत्रिक व्यवस्थापन आणि नफा वाढविण्याच्या विविध बाबींवर मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमास डॉ. उपेंद्र मुंडे, सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) तसेच संजय साळुंखे पाटील, अध्यक्ष (PBFA) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय राज्यातील प्रगतशील दुग्ध उत्पादक शेतकरी आपल्या यशस्वी अनुभवांचे कथन करणार असून, आधुनिक दुग्ध व्यवसायातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहितीही उपस्थितांना मिळणार आहे.
या मेळाव्यात PBFA सदस्य नोंदणी, आधुनिक दुग्ध व्यवसायाचे तंत्रज्ञान, पशुपालनातील नवीन संकल्पना, तसेच प्रगतशील गोपालकांशी थेट संवादाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट दुग्ध उत्पादकांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर करण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळविण्यासाठी तालुक्यातील तसेच परिसरातील सर्व दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


