नगरपरिषदेच्या कर मूल्यांकन प्रक्रियेविरोधात नागरिकांचे निवेदन

नगरपरिषदेच्या कर मूल्यांकन प्रक्रियेविरोधात नागरिकांचे निवेदन
जुन्याच दराने कर आकारणी करावी; नागरिकांची मागणी
जामखेड, प्रतिनिधी : जामखेड नगरपरिषदेच्या प्रस्तावित चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकन नोटीस प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचा आरोप करत शहरातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. तसेच सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मागील वर्षाप्रमाणेच कर आकारणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, कर मूल्यांकनाच्या नोटिसा २० मे २०२६ रोजी तयार करण्यात आल्याचे नमूद असले तरी त्यांचे वितरण सुमारे पंधरा दिवसांनी करण्यात आले. अनेक नागरिकांना आक्षेप नोंदविण्याची मुदत संपण्यापूर्वी नोटिसा मिळाल्या नाहीत. काही मालमत्ताधारकांपर्यंत अद्यापही नोटिसा पोहोचलेल्या नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
जुन्या मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्याने अनेक मालमत्तांना नवीन क्रमांक देण्यात आलेले नाहीत. काही नोंदींमध्ये मालमत्ताधारक व भोगवटादारांची नावे तसेच क्षेत्रफळ चुकीचे नमूद करण्यात आल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
नवीन मालमत्ता क्रमांकाचे उतारे नागरिकांना किमान पंधरा दिवस ते कमाल एक महिना पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत. संबंधित तारखांबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करून सर्व माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या सर्व बाबींची दखल घेऊन सन २०२६-२७ ची कर आकारणी सन २०२४-२५ प्रमाणेच करण्यात यावी. तसेच नव्या कर आकारणीच्या नोटिसा नगरपरिषद कार्यालयात नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर डॉ. प्रशांत प्रदीप गायकवाड, अमोल शिवाजी मंगले, संदीप विश्वनाथ टेकाळे यांच्यासह शहरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



