बीड
नाट्यगृहाविषयी जी चूक योगेश क्षीरसागर यांनी केली तीच चूक आ. पंडित करीत आहेत.- डॉ साळुंके

नाट्यगृहाविषयी जी चूक योगेश क्षीरसागर यांनी केली तीच चूक आ. पंडित करीत आहेत.- डॉ साळुंके
बीड (प्रतिनिधी) बीडच्या नाट्यगृहाला एक आठ कोटी 19 लाख रुपयांचा निधी आल्यानंतर तातडीने नाट्यगृहाची पाहणी करण्यासाठी गेवराईचे आ. विजयसिंह पंडित हे गेले ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु जात असताना बीड शहरातील गेल्या चार दशकांपासून कार्यरत असणाऱ्या विविध नाट्य संस्था आणि त्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रण दिले असते तर त्यांना नाट्यगृहाची योग्य दुरावस्था कळाली असती. जी चूक योगेश क्षीरसागर हे करीत, त्याचीच पुनरावृत्ती आमदार पंडित यांच्याकडून झाल्याचे दुःख आहे असे मत नाट्यगृह कृती समितीचे अध्यक्ष डॉ. सतीश साळुंके यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
योगेश क्षीरसागर हे श्रेयलाटण्या साठी नाट्यगृहाविषयी चमकोगिरी करत असत व नाट्यगृह हे त्यांच्या स्वतःच्या मालकीचे आहे या अविर्भावांमध्ये ते वावरत असत.नाट्य कलावंतांना ते विश्वासात घेत नसत. त्याचा फटका बीडच्या सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंतांनी त्यांना दिला. ते देखील स्वतःच कुणालाही कल्पना न देता नाट्यगृहात जात आणि त्याच्या क्लिप व्हायरल करत हे सगळं केवळ प्रसिद्धीसाठी ते करत होते असाच समज नाट्यक्षेत्रात झाला होता. बीड नगरपालिकेची अप्रत्यक्ष सत्ता ज्यांच्या हाती आली आहे ते आ. विजयसिंह पंडित हे एक सुसंस्कृत आणि विचारशील तरुण राजकारणी म्हणून बीड मधील नाट्यकलावंतांना त्यांच्यातर्फे मोठ्या अपेक्षा निर्माण झालेल्या असतानाच त्यांनीही कोणत्याही कलावंतांना बरोबर न घेता नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन औपचारिकता पार पाडली. वास्तविक पाहता या नाट्यगृहाची खरी दुरावस्था नगरपालिकेनेच केली आहे. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नाट्यगृहाविषयी किती ज्ञान आहे हे सर्वश्रुत आहे. हे नाट्यगृह एका स्वच्छता निरीक्षकाच्या हवाली करून नगरपालिका मोकळी झाली आहे. आ. पंडित यांनी बीड शहरातील नाट्यसंस्थांचे प्रतिनिधी बरोबर घेतले असते तर त्यांना खरी स्थिती कळाली असती. शहरातील नाट्यक्षेत्रातील कलावंतांची एक समिती स्थापन करून नूतनीकरणाच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असल्याचे मत नाट्यगृह कृती समितीचे अध्यक्ष डॉ.सतीश साळुंके यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.



