दहिगाव रेचा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी;
अंजनगाव सुर्जी: दहिगाव रेचा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि जिल्हा परिषद अंगणवाडी केंद्र येथे आज दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्याने झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि स्त्रीसशक्तीकरणासाठी केलेल्या अमूल्य कार्यावर प्रकाश टाकला.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी समाजातील अनेक अडचणींवर मात करत कार्य केले. त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन ठरत असून, शिक्षणाची गोडी निर्माण करून समाज परिवर्तनासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान महिला शिक्षणाचे महत्त्व, मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाची भूमिका आणि सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी तसेच अंगणवाडीतील बालकांनी आपल्या छोटेखानी सहभागातून कार्यक्रमात रंगत आणली.
या कार्यक्रमास शाळेतील शिक्षकवर्ग, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर चालण्याचा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडवण्याचा संकल्प व्यक्त केला.
याप्रसंगी मुख्याध्यापक दिपाली जुनघरे मॅडम, कल्पना म्हसणे मॅडम, सारिका धामोळे मॅडम, विनोदिनी खेडकर मॅडम, चैताली सावरकर मॅडम आणि शिवानी भगत मॅडम उपस्थित होत्या.



