बीड
भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी मोफत बाटली बंद पाणी वाटप ; नगरपालिकेत पिण्याच्या पाण्याची वानवा :- डॉ. गणेश ढवळे

भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी मोफत बाटली बंद पाणी वाटप ; नगरपालिकेत पिण्याच्या पाण्याची वानवा :- डॉ. गणेश ढवळे
बीड :- (दि.१७)बीड नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अर्ज भरण्यास इच्छुकांची पालिकेत मोठी गर्दी वाढली आहे. मात्र, अर्ज भरण्यासाठी आलेल्या इच्छुक आणि समर्थकांचीच नव्हे तर निवडणूक कर्मचार्यांचीही पालिकेत पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः पंचाईत होत आहे.
पालिकेतील पिण्याचे पाणी फिल्टर अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. पाणी उपलब्ध नसल्याने अर्जदार आणि नागरिकांना पाणी प्यायला बाहेरच्या हॉटेलमध्ये जावे लागत आहे. पाणी खरेदीसोबत चहाचा खर्चही करावा लागत असल्याने त्यांच्यावर अनावश्यक आर्थिक भुर्दंड पडत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या मुख्य इमारतीतच पाण्यासाठी ही धावपळ होत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगरपालिका कार्यालयात पिण्याच्या पाण्याची आणि शौचालये दुरुस्तीची तातडीने उपाययोजना करण्यात यावी असे निवेदन मुख्याधिकारी नगरपरीषद बीड शैलेश फडसे यांना देण्यात आले.यावेळी डॉ . गणेश ढवळे लिंबागणेशकर आणि शेख युनुस च-हाटकर यांच्या मार्फत निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि त्यांचे समर्थक यांना मोफत बाटली बंद पाण्याचे वाटप करण्यात आले
निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव आणि मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी निवडणूक कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात अपयश आल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
याकडे प्रशासन आणि भावी लोकप्रतिनिध्यांचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर आणि शेख युनुस च-हाटकर यांच्या पुढाकाराने आज (दि.१७) मोफत बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.
—
शौचालयाअभावी भावी लोकप्रतिनिधींची कुचंबना
शहराचे भावी नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहत अर्ज भरण्यास आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या इच्छुकांना आणखी एक मोठी अडचण सहन करावी लागत आहे.
पालिकेच्या तळमजल्यावरील वाहन पार्किंग परिसरातच उघड्यावर लघुशंका करण्याची वेळ अनेकांवर येत आहे. पहिल्या मजल्यावरील शौचालये पत्रे लावून बंदिस्त करण्यात आली आहेत. निवडणुक कार्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना शौचालयासाठी दुसरा-तिसरा मजला चढावे लागत आहे.
पालिकेच्या इमारतीत सर्वत्र घाण, थुंकीचे डाग, भिंतींची दुरवस्था अशी परिस्थिती असून स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.
—



