बीड

वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासणे ही काळाची गरज- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासणे ही काळाची गरज- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड दि.4(प्रतिनिधी)ः- वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम असून संतांच्या आशीर्वादाने आज गावोगावी नामस्मरण सुरू आहे. समाज एकत्र आणणे हाच यामागचा मुख्य उद्देश असून, संत तुकाराम महाराजांच्या विचारांवर समाज घडवण्याचे काम वारकरी कुटुंब करत आहेत. आपल्या समृद्ध संस्कृतीचे जतन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

बीड येथील राधाकृष्ण नगरी भागात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या सांगता प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नमूद केले की, शक्ती आणि भक्तीची सांगड घालून हनुमानाची आराधना आणि परमेश्वराचे नामस्मरण करणे ही आपली परंपरा आहे. राधाकृष्ण नगरी भागातील नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा देण्याचा आमचा कायम प्रयत्न राहिला आहे. विकासाची ही आस आम्ही पूर्ण केली असून, येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या माध्यमातून धार्मिक कार्यालाही बळ मिळत आहे सध्याच्या काळात वाढत चाललेली ’भोंदूगिरी’ आणि समाजाची होणारी दिशाभूल यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. जर आपण प्रभू श्रीराम आणि हनुमानाचा आदर्श सोडला, तर देव आणि भक्ताचे नाते टिकवणे कठीण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. या कार्यक्रमाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राधाकृष्ण नगर भागातील या उत्सवामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, परिसरातील भाविकांच्या उपस्थिती मध्ये हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला.

Back to top button