चांगल्या शिक्षकाची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही -माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड दि.4(प्रतिनिधी):- माणूस निवृत्त झाला तरी काम करण्याची उमेद कायम असली पाहिजे. भास्कर चादर हे प्रवेशापासून निवृत्तीपर्यंत एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून कार्यरत राहिले. समाजात अनेक गोष्टी बदलतील, पण एका चांगल्या शिक्षकाची जी उणीव असते, ती कोणीही भरून काढू शकत नाही, असे गौरवद्गार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी काढले.
विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. भास्कर चादर यांच्या सेवागौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, अरुण डाके, प्रा.सर्जेराव काळे, सरपंच, प्रभारी प्रशासक योगेश पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बदलत्या काळावरही भाष्य केले. ते म्हणाले की, आजच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हातात नवीन तंत्रज्ञान आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) आधारे अनेक कामे सोपी होत असली, तरी त्याचा गैरवापर होऊन वादही निर्माण होत आहेत. अशा वेळी नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामासाठी केला तर आयुष्य घडते, अन्यथा ते उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही असे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले
33 वर्षांचा सेवाप्रवास
आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रा. भास्कर चादर भावूक झाले होते. त्यांनी आपल्या प्रवासाचा उलगडा करताना सांगितले की, 1982 साली जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नवगण राजुरी येथे पुढील शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर मला आदर्श शिक्षण संस्थेत नोकरीची संधी मिळाली आणि आज या सेवेला 33 वर्षे पूर्ण झाली आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम जाधव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अनुसे यांनी मानले. या सोहळ्याला परिसरातील नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



