📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मनरेगा अंतर्गत घोटाळा; रस्ते गेले चोरीला… कुटेवाडीमध्ये कागदोपत्री बनावट रस्ते दाखवून उचलली लाखोंची बीले!

मनरेगा अंतर्गत घोटाळा; रस्ते गेले चोरीला…
कुटेवाडीमध्ये कागदोपत्री बनावट रस्ते दाखवून उचलली लाखोंची बीले!
शासनाची फसवणूक करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा
नंदकुमार कुटे यांची रोहयो मंत्री यांच्याकडे तक्रार
बीड (प्रतिनिधी) :- महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत बीड तालुक्यातील कुटेवाडी येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. कागदोपत्री रस्ते दाखवून लाखो रुपये उचलल्या गेले आहेत. सरपंच, सरपंच पती, नरेगा अभियंता यांनी संगणमत करून बोगस रेकॉर्ड तयार करून शासनाची फसवणूक केली असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार कुटे यांनी बीड जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महात्मा गांधी रोजगार योजने अंतर्गत मौजे कुटेवाडी येथे चिरकटी ते अंबाबाई मंदिरापर्यंत सिमेंट रस्ता तसेच अंबाबाई मंदिरे ते बापुराव कुटे पर्यंत सिमेंट रस्ता करणे करीता या दोन्ही कामांना शासन स्तरावरुन मंजुरी मिळालेली होती. सदर दोन्ही कामे न करताच सरपंच पती, मनरेगाचे अभियंता व इतर कर्मचारी यांनी संगनमत करुन ग्रामरोजगार सेवक यांच्या खोट्या स्वाक्षर्‍या करुन पंचायत समिती बीड स्तरावरुन बोगस मस्टर काढलेले आहे. सदर मस्टर आधारे काम पूर्ण केले असल्याचे खोटे दस्ताऐवज दाखवून सदरील कामाचे बोगस बील उचलून शासनाची व कुटेवाडी ग्रामस्थांची फसवणूक केली आहे.
सदर कामास अनुसरुन संबंधित सरपंच पती, मनरेगाचे अभियंता यांनी बोगस एम.बी.व इतर खोटे रेकॉर्ड तयार करुन अकुशल निधी ही उचललेला आहे व उर्वरीत बाकी असलेल्या कुशल निधीची मागणी केलेली आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक योजनेतील जसे की शेवगा लागवड, गायगोठा, जलसिंचन विहीर इत्यादी कामांचे बोगस रेकार्ड तयार करुन यापूर्वीही देयके उचलून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असून या सर्व बोगस कामांची निपक्षपाती चौकशी करुन सरपंच, सरपंच पती, मनरेगा अभियंता व या योजनेतील दोषींवर कडक कार्यवाही करुन तात्काळ गुन्हे दाखल करावेत असेही निवेदनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार कुटे यांनी म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी रोहयो मंत्री तसेच बीड जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत. या प्रकरणी तात्काळ कार्यवाही न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
Back to top button