बीड
कोट्यावधीची ऊस देयक थकीत संतप्त शेतकरी करणार कारखान्यावर आक्रोश

कोट्यावधीची ऊस देयक थकीत
संतप्त शेतकरी करणार कारखान्यावर आक्रोश
बीड / प्रतिनिधी
मागील तीन साडेतीन महिन्यापासून जिल्ह्यातील अनेक ऊस कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. वास्तविक पाहता पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांना ही ऊसाची रक्कम मिळणे अनिवार्य असताना ऊस कारखाना व्यवस्थापनाने अजून ही रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संतप्त असून सनदशीर मार्गाने हा प्रश्न सोडविण्यात यावा अथवा दि 9 रोजी ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यावर आक्रोश करणार असल्याची माहिती उत्पादक शेतकरी संघर्ष समिती कडून देण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील तसेच जिल्हयाच्या सीमेवर असलेल्या परभणी जिल्ह्यातील साखर कारखान्याने जिल्हयातील असंख्य शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाला नेला. कायद्यानुसार ऊस गाळप पश्चात्य 15 दिवसात कारखाना प्रशासनाने ऊस देयक अदा करणे बंधनकारक असताना देखील असंख्य शेतकऱ्यांची कोट्यावधीची रक्कम साखर कारखानदाराने अद्याप ही शेतकऱ्यांना अदा केलेली नाही. प्रलंबित ऊस देयक अदा करण्यात यावेत याकरिता अखिल भारतीय किसान सभा, ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती मार्फत वेळोवेळी निवेदने, आंदोलने करण्यात आली मात्र अद्याप देखील शेतकऱ्यांना ऊस देयक प्राप्त झालेले नाही. या सर्व विदारक परिस्थितीत ऊस हंगामाच्या सुरवातीला ऊस दर घोषणा आंदोलनावेळी ज्याप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली, तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये आणि शेतकऱ्यांनाही त्यांच्या प्रलंबित ऊस बिलाचे पैसे लवकरात लवकर मिळावेत याकरिता संघर्ष समिती मार्फत गुरुवार दि 9 रोजी ऊस गाळप करणाऱ्या सर्वच साखर कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकरी धडक देत आक्रोश करणार आहेत.जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन कारखाना व्यवस्थापन व ऊस उत्पादक संघर्ष समिती यांच्यात सुसंवाद घडवून आणावा आणि शेतकऱ्यांचा ऊस बिलाचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यास मदत करावी अन्यथा निर्माण उद्भवना-या परिस्थितीस प्रशासन कारणीभूत असेल असे निवेदन वजा मागणी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती यांनी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय बीड, परभणी यांच्याकडे केली आहे.


