बीड

नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर?; जामखेडमध्ये गॅस टंचाईविरोधात वंचित आघाडीचे आंदोलन

नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर?; जामखेडमध्ये गॅस टंचाईविरोधात वंचित आघाडीचे आंदोलन

तहसील कार्यालय समोर चूल पेटवून अनोखा निषेध

जामखेड प्रतिनिधी: आज दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडी, जामखेड तालुका यांच्या वतीने नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर? गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई काळाबाजार सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक लुटमार या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड.डॉ.अरुण जाधव व नगरसेविका संगीता भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयासमोर चुल पेटवून आंदोलन करण्यात आले.यावेळी तहसीलदार धनंजय बांगर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी अरुण जाधव म्हणाले की, सध्या देशभरात गॅस सिलिंडरची भीषण व कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आलेली आहे. ही टंचाई नैसर्गिक नसून नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्यात आली असल्याचा ठोस संशय जनतेमध्ये निर्माण झाला आहे. याचाच फायदा घेत काळाबाजार करणारे दलाल व काही संबंधित यंत्रणा सर्वसामान्य नागरिकांची उघडपणे आर्थिक लूट करत आहेत.

९१६ रुपयांना उपलब्ध असणारा गॅस सिलिंडर जाणीवपूर्वक बाजारातून गायब करण्यात आला असून, तोच सिलिंडर ४,००० ते ५,००० रुपयांपर्यंत काळ्या बाजारात विकला जात आहे. ही परिस्थिती अत्यंत संतापजनक असून, यामागे कोणाचे संरक्षण आहे, असा थेट प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. महिला, गृहिणी, गरीब, श्रमिक व मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस मिळत नसल्याने त्यांच्या घरातील चुली अक्षरशः विझल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना तासन्तास लांबच लांब रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नाही. ही परिस्थिती अत्यंत अमानुष व असह्य बनली आहे.

एकीकडे सर्वसामान्य जनता मूलभूत गरजांसाठी झगडत असताना, दुसरीकडे काळाबाजार करणारे लोक हजारो रुपये कमवत आहेत. ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे व संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी हे तीव्र आंदोलन उभारण्यात आले आहे असे म्हणाले.

नगरसेविका संगीता भालेराव,बापूसाहेब ओहोळ,अनिल सदाफुले,प्रा. सुनील जावळे,सलीम मदारी, रजनी औटी,मनीषा जाधव यांनी भूमिका मांडल्या.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव, नगरसेविका संगिता भालेराव, प्रवक्ते बापुसाहेब ओव्होळ, विशाल गव्हाळे, प्रा. सुनील जावळे, भिमराव चव्हाण, अनिल सदाफुले, हुसेन मदारी, मच्छिंद्र जाधव, रामचंद्र भालेराव,सुमित भालेराव अंकल घायतडक,संदीप आखाडे,हरी जाधव,नितीन जाधव,सचिन चव्हाण,रजनी औटी, ललिता पवार यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा व अहिल्यानगर महिला संघटक सुरेखा रत्नाकर सदाफुले, अरुणा सदाफुले,कुसुम साळवे, मनिषा जाधव, रोहिणी काळे, पूजा जाधव, सीमा सरोदे, दिव्या जाधव आदी तसेच संतोष चव्हाण, ऋषिकेश गायकवाड, अरविंद जाधव आणि वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनात महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button