बीड
सह्याद्री देवराई वनप्रकल्पातील मियावाकी घनवन प्रकल्पाची दुरावस्था ; “झाडांच्या काड्या”; जिल्हा प्रशासन व वनविभाग झोपेत – डॉ. गणेश ढवळे

सह्याद्री देवराई वनप्रकल्पातील मियावाकी घनवन प्रकल्पाची दुरावस्था ; “झाडांच्या काड्या”; जिल्हा प्रशासन व वनविभाग झोपेत
– डॉ. गणेश ढवळे
बीड (दि. ०७): बीड शहरालगत पालवण येथील सह्याद्री देवराई वनप्रकल्पांतर्गत सन २०१८-१९ मध्ये करण्यात आलेल्या मियावाकी पद्धतीच्या घनवन वृक्षलागवडीची दयनीय अवस्था उघडकीस आली आहे. सिने अभिनेते सयाजी शिंदे आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या प्रकल्पातील अनेक झाडे सुकून काड्या झालेली असून काही झाडांना वाळवी लागल्याचे दिसून येत आहे.
वृक्षांना पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेली पाइपलाइनही अनेक ठिकाणी जळालेल्या अवस्थेत आढळून आली आहे. या संपूर्ण प्रकल्पाकडे वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच वृक्षलागवडीसोबत वृक्षसंवर्धनाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी डॉ. ढवळे यांनी केली आहे. याशिवाय, गेल्या १० वर्षांतील बीड जिल्ह्यातील सर्व वृक्षलागवडींचे ऑडिट करण्यात यावे आणि कागदोपत्री झालेल्या बोगस वृक्षलागवडींची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
—
मियावाकी पद्धतीबाबत माहिती
जपानी वनस्पतिशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेली ही घनवन निर्मिती पद्धत कमी जागेत अत्यंत दाट आणि वेगाने वाढणारे जंगल तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या पद्धतीत देशी प्रजातींची झाडे वापरून प्रति चौरस मीटरमध्ये ३ ते ४ रोपे लावली जातात. वनस्पती, झुडपे, उपवनस्पती आणि मध्यम उंचीची झाडे अशा बहुस्तरीय रचनेत लागवड केली जाते.
या पद्धतीने पारंपरिक जंगलांच्या तुलनेत १० पट वेगाने आणि ३० पट अधिक घनतेने जंगल तयार होते. केवळ ३ वर्षांत हे जंगल स्वयंपूर्ण बनते आणि जैवविविधतेला मोठा आधार मिळतो. शहरी भागात हरित क्षेत्र वाढवणे, तापमान कमी करणे, हवा शुद्ध करणे आणि पक्षी-कीटकांना आश्रय देणे हे याचे प्रमुख फायदे आहेत.
—
दरम्यान, बीड जिल्ह्यावर दरवर्षी दुष्काळाचे संकट घोंगावत असताना वृक्षलागवड आणि तिचे संवर्धन याकडे होत असलेले दुर्लक्ष अत्यंत लाजिरवाणे असल्याची संतप्त प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली आहे.



