बीड

छाया पांचाळ मृत्यू प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन

छाया पांचाळ मृत्यू प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन
कारवाई न झाल्यास १३ एप्रिलला ‘शोले स्टाईल’ आंदोलनाचा इशारा
बीड (दि. १०): बीड जिल्हा रुग्णालयात प्रसुतीदरम्यान मृत्यू झालेल्या छाया गणेश पांचाळ (रा. अंबीलवडगाव, ता. जि. बीड) प्रकरणी संबंधित डॉक्टर व नर्स यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत आरोग्यमंत्री  प्रकाश आबिटकर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
या प्रकरणी गेल्या वर्षभरापासून न्यायासाठी पाठपुरावा सुरू असून, संबंधितांवर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. गणेश पांचाळ (मयत महिलेचे पती), सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
वर्षभरापासून न्यायासाठी लढा
माहितीनुसार, वर्षभरापूर्वी बीड जिल्हा रुग्णालयात प्रसुतीदरम्यान छाया पांचाळ यांचा डॉक्टर व नर्स यांच्या हलगर्जीपणामुळे अतिरक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. वेळेत योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. डॉक्टर संजय राऊत यांनी संबंधित छाया पांचाळ मृत्यूप्रकरणी थातूरमातूर कारवाई करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला श्रीमती रेखा कालिदास पवळे शस्त्रक्रिया परिचर वर्ग -४ जिल्हा रुग्णालय बीड यांना सदर प्रकरणी निलंबन करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला व वैद्यकीय अधिकारी,नर्स, यांना वाचवले आहे. म्हणून त्यांच्यावरही प्रशासकीय कारवाई करण्यात यावी,
तसेच उपसंचालक आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ कार्यालयाकडून गठीत समितीच्या अहवालात दहा मुद्द्यांवर संबंधित डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?
अहवाल प्राप्त होऊनही बीड शहर पोलीस ठाण्याकडून गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
‘शोले स्टाईल’ आंदोलनाचा इशारा
ओबीसी हक्क परिषद (मराठवाडा) अध्यक्ष किस्किंदा दिलीप पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली १३ एप्रिल २०२६ रोजी ‘शोले स्टाईल’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
“७ दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास शहरातील पाण्याच्या टाकीवर किंवा शासकीय इमारतीवर चढून आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा देण्यात आला आहे.
उपस्थिती
या निवेदनावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते, त्यामध्ये –
गणेश पांचाळ (पती)
डॉ. गणेश ढवळे (सामाजिक कार्यकर्ते)
बाळासाहेब मोरे पाटील
अशोक येडे
प्रदीप बांगर
बाजीराव ढाकणे
रामधन जमले
सीताताई भोसले
आदींचा समावेश होता.
इशारा
आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Back to top button