📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

इंग्रजी संवादकौशल्य आत्मसात करणे काळाची गरज – डॉ. विजयकुमार बांदल यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

इंग्रजी संवादकौशल्य आत्मसात करणे काळाची गरज – डॉ. विजयकुमार बांदल यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

तुलसी महाविद्यालयात ‘फर्स्ट इम्प्रेशन मॅटर्स’ स्पर्धा उत्साहात

बीड (दि.८) – इंग्रजी संवाद कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी नियमित वाचन व भाषेचा सखोल अभ्यास करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नेकनूर येथील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार बांदल यांनी केले.

फर्स्ट इम्प्रेशन मॅटर्स’ या स्पर्धेप्रसंगी तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना ते बोलत होते. कार्यक्रमाला देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, अचिवर्स अकॅडमीचे संचालक प्रा.अर्जुन राठोड आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डी.जी. निकाळजे हे उपस्थित होते.

डॉ. बांदल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. संवादकौशल्य हे केवळ करिअरचेच नव्हे, तर प्रभावी व्यक्तिमत्त्वाचेही प्रमुख माध्यम आहे. यावेळी प्रा.प्रदीप रोडे आणि प्रा.अर्जुन राठोड यांनीही संवादातील स्पष्टता, आत्मविश्वास आणि फर्स्ट इम्प्रेशनच्या महत्त्वावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रभावी व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी प्रेरणा दिली.

या स्पर्धेच्या दरम्यान ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत २ ते ५ मिनिटांत इंग्रजीत संवादशैली, पोशाख, देहबोली व विचारप्रदर्शनातून स्वतःची सकारात्मक छाप पाडण्याचा प्रयत्न केला. परीक्षकांनी सादरीकरणांचे बारकाईने परीक्षण करून गुणवत्तेनुसार विजेत्यांची निवड केली. धर्मे अथर्व याने प्रथम क्रमांक, भोसले सागर याने द्वितीय क्रमांक तर धुताडमल ओमकार याने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कार्यक्रम समन्वयक डॉ.अस्मिता साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली, महाविद्यालयाचे शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त पुढाकारातून करण्यात आले.

Back to top button