📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जामखेड शहरासह तालुका कडकडीत बंद जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा

जामखेड शहरासह तालुका कडकडीत बंद

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा

जामखेड प्रतिनिधी : मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी जामखेड शहर व तालुक्यात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी प्रतिसाद देत दुकाने व व्यावसायिक आस्थापने बंद ठेवली.

शहरातील प्रमुख बाजारपेठा, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच विविध व्यावसायिक आस्थापना सकाळपासून बंद असल्याने नेहमीची वर्दळ कमी झाली होती. बंदच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यात आला.

यावेळी नगरसेवक वसीम सय्यद यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याला मुस्लिम समाजाचा पाठिंबा असल्याचे सांगितले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय मागणीसोबत मुस्लिम समाज खंबीरपणे उभा आहे. जुन्या अभिलेखांमध्ये कुणबी म्हणून नोंद असलेल्या मुस्लिम बांधवांनाही शासनाच्या नियमानुसार आरक्षणाचा लाभ मिळावा,अशी मागणी त्यांनी केली. तसेच समाजातील एकजूट अधोरेखित करण्यासाठी बंदमध्ये सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते प्रा.कुंडल राळेभात यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना शासनाला इशारा दिला.मराठा समाजाला आरक्षणाचा न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील. शासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,असे त्यांनी सांगितले. तसेच सत्ताधारी मंत्री अथवा लोकप्रतिनिधी जामखेड तालुक्यात आल्यास त्यांच्या वाहनांचा मार्ग अडवून घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी दिला.

अखंड मराठा समाजाच्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादातून जामखेडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकजूट दिसून आली. शासनाने आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. बंदला सहकार्य करणाऱ्या व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांचे अखंड मराठा समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले.

Back to top button