पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा इशारा देताच महिलांसाठीचे स्वच्छतागृह सुरू– डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर

पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा इशारा देताच महिलांसाठीचे स्वच्छतागृह सुरू– डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड : (दि.१८)बीड पंचायत समिती कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांसह कार्यालयात येणाऱ्या महिला अभ्यागतांसाठी असलेले स्वच्छतागृह पाणीटंचाईमुळे गेल्या अनेक दिवसांपासून कुलूपबंद अवस्थेत होते. प्रवेशद्वारावर “बाहेरील शौचालय वापरावे” अशी नोटीस लावण्यात आली होती, जी महिलांसाठी अत्यंत गैरसोयीची आणि असुरक्षिततेची बाब ठरली होती.
सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख – बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी दि.१७ रोजी पालकमंत्री अजितदादा पवार तसेच वरिष्ठ प्रशासनाला लेखी निवेदन देऊन या संदर्भात तीव्र निषेध नोंदविला. त्यांनी म्हटले होते की, ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांना बाहेर शौचालय शोधणे ही केवळ गैरसोय नव्हे, तर सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. तसेच ही घटना “स्वच्छ भारत मिशन” योजनेला हरताळ फासणारी असल्याचा आरोप करत दि.२० ऑक्टोबर रोजी पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता.
याची तात्काळ दखल घेत गटविकास अधिकारी श्री. अशोक राठोड यांनी स्पष्ट केले की, संबंधित स्वच्छतागृह दुरुस्तीच्या कामामुळे तात्पुरते बंद करण्यात आले होते. पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करून ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तसेच “फक्त पुरुषांसाठी” अशी नोटीस अनवधानाने न काढल्याची कबुली देत ती हटविण्यात आली असल्याचेही त्यांनी लेखी पत्रकाद्वारे डॉ. ढवळे यांना कळविले आहे.
यानंतर महिलांसाठीचे स्वच्छतागृह पुन्हा खुले करण्यात आल्याने महिला कर्मचाऱ्यांसह अभ्यागतांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे सोमवार, दि.२० रोजी होणारे “पंचायत समितीला कुलूप ठोका आंदोलन” स्थगित करण्यात आले आहे.



