रोहित पवार गटाला जामखेड बाजार समितीत धक्का; उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव दाखल

रोहित पवार गटाला जामखेड बाजार समितीत धक्का; उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव दाखल
जामखेड प्रतिनिधी –
छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, रोहित पवार गटाचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात १८ पैकी १२ संचालकांच्या स्वाक्षऱ्यांसह हा ठराव दाखल करण्यात आला.
सुमारे दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत रोहित पवार गटाचे ९ व नामदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप गटाचे ९ संचालक विजयी झाले होते. त्यावेळी ईश्वर चिठ्ठीद्वारे शरद पंडित कार्ले सभापती म्हणून निवडले गेले होते, तर उपसभापतीपदी रोहित पवार गटाचे कैलास वराट विराजमान झाले होते.
मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये रोहित पवार गटाकडून विकासकामांमध्ये सातत्याने अडथळे आणले जात असल्याचा आरोप भाजप गटाने केला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार गटातील तीन संचालक — अंकुश ढवळे, राहुल बेदमुथा व नारायण जायभाय — यांनी भाजप गटाकडे पाठिंबा दर्शवून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
या राजकीय घडामोडींमुळे बाजार समितीतील सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुढील प्रक्रिया काय होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



