
चकलांबा पोलीस ठाण्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?
सपोनि सचिन इंगळे आल्यापासून गुन्हेगारी वाढल्याची चर्चा; कर्मचाऱ्यांच्याच दाव्याने खळबळ
गेवराई (प्रतिनिधी) चकलांबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि सचिन इंगळे यांच्या कार्यकाळात परिसरात चोऱ्या, हाणामाऱ्या, अवैध दारू विक्री, हातभट्ट्या तसेच इतर गुन्हेगारी प्रकारांमध्ये वाढ झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना पोलीस प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे.
गावोगावी अवैध धंदे उघडपणे सुरू असून रात्रीच्या वेळी दारू, वाळू आणि इतर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली असल्याचे नागरिक सांगत आहेत. अनेक ठिकाणी भांडणे, मारहाणीच्या घटना घडत असताना पोलिसांची गस्त आणि कारवाई दिसून येत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, “एस पी साहेबांच्या जवळचे असल्याने माझे कुणीच वाकडे करू शकत नाही,” अशी भाषा वापरली जात असल्याचा दावा काही कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला असल्याने पोलीस विभागातच खळबळ उडाली आहे. या चर्चेमुळे चकलांबा पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
परिसरातील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चकलांबा पोलीस स्टेशनच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांमुळे सामान्य नागरिक भयभीत झाले असून, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौकट
“अवैध धंद्यांना अभय मिळत असल्याची चर्चा”
चकलांबा परिसरात हातभट्ट्या, अवैध दारू विक्री आणि संशयित गुन्हेगारी कारवाया वाढल्याने पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. “कारवाईपेक्षा दुर्लक्षच अधिक दिसत आहे,” अशी भावना परिसरात व्यक्त होत आहे


